कुडचडे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण संसदेत उपस्थित करणार : वाल्मिकी नाईक

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10 mins ago
कुडचडे लैंगिक अत्याचाराचे प्रकरण संसदेत उपस्थित करणार : वाल्मिकी नाईक

पणजी: भाजप सरकार सुरुवातीपासूनच कुडचडे येथील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असून, या प्रकरणातील आरोपीला संरक्षण देण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आम्ही असे होऊ देणार नाही. हे प्रकरण आम्ही यापूर्वीच राष्ट्रीय पातळीवर नेले आहे. उद्या आम्ही राज्यपालांची भेट घेणार आहोत, तसेच हे प्रकरण संसदेतही उपस्थित करणार असल्याचे 'आप'चे प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सांगितले. शुक्रवारी पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलीस मुख्यालयासमोर माध्यमांशी संवाद साधला.

नाईक म्हणाले की, या प्रकरणातील आरोपी हा भाजप नगरसेवकाचा मुलगा आहे. त्यामुळे प्रकरणाला वाचा फुटल्यापासूनच ते दडपण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, यामध्ये गोवा पोलीसही सामील आहेत. प्रकरण गंभीर असल्याने आम्ही आज पोलीस महासंचालकांना निवेदन देण्यासाठी आलो होतो, मात्र त्यांनी केवळ दोन व्यक्तींनाच भेटण्याची परवानगी दिली. एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणे आम्हाला मुख्यालयाच्या दारातच अडवण्यात आले. गोवा पोलीस नक्की कोणाला घाबरत आहेत, हे त्यांनी सांगणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी मिरामार येथे अशाच प्रकारचे 'सेक्स स्कँडल' झाले होते; त्यावेळीदेखील आरोपींना वाचवण्यात आले होते. कुडचडे प्रकरणी स्थानिकांचा दबाव वाढल्यानंतरच पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. आरोपी भाजपशी संबंधित असल्याने पोलिसांनी त्याची आणि त्याच्या वडिलांची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. इतर नगरसेवकांना पोलीस ठाण्यात जाऊन दबाव निर्माण करावा लागला होता. स्वयंसेवी संस्थांनी (NGOs) पाठपुरावा केल्यावरच आरोपीवर 'पॉक्सो' (POCSO) अंतर्गत कलमे दाखल करण्यात आली. या प्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्षांनी कडक भूमिका घेणे गरजेचे होते, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा