देशात लॉकडाऊन नाही; तयारी भक्कम ठेवा! : पंतप्रधानांची सर्व राज्यांना ‌सूचना

सौर ऊर्जा, जैव इंधन यासारख्या पर्यायी स्त्रोतांचा वापर वाढवा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
34 mins ago
देशात लॉकडाऊन नाही; तयारी भक्कम ठेवा! : पंतप्रधानांची सर्व राज्यांना ‌सूचना

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi) यांनी पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि ऊर्जा संकटाच्या (energy crisis) पार्श्वभूमीवर देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत (chief ministers) महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारांमधील समन्वय अधिक मजबूत करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. लॉकडाऊन लागणार नाही तरी तयारी भक्कम ठेवावी लागणार आहे. सौर ऊर्जा, जैव इंधन यासारख्या पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा वापर जास्तीत जास्त वाढवण्याकडे सर्व राज्यांनी तत्काळ लक्ष देण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

कोविड-१९ काळातील ‘टीम इंडिया’च्या प्रयत्नांची आठवण

बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी कोविड-१९ काळातील ‘टीम इंडिया’च्या यशस्वी प्रयत्नांची आठवण करून देत, त्याच पद्धतीने सध्याच्या संकटाला सामोरे जाण्याचे आवाहन केले. पश्चिम आशियातील युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून, विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर ताण निर्माण झाला आहे.

काळाबाजार रोखा 

पंतप्रधानांनी सर्व राज्यांना काळाबाजार (black marketing) रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच इंधन व गॅसच्या उपलब्धतेत येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी केंद्र-राज्य समन्वय अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवा

सौर ऊर्जा, जैव इंधन यासारख्या पर्यायी ऊर्जा स्त्रोतांचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात वाढवण्याची गरज आहे. याकडे सर्व राज्यांनी तत्काळ लक्ष देण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ऊर्जा संकटाचा परिणाम लक्षात घेता केंद्र सरकारने व्यावसायिक एलपीजी वाटपात २० टक्क्यांनी वाढ केली असून, औद्योगिक क्षेत्राला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

केंद्र व राज्यांत नियमित संवादाची गरज

पंतप्रधान मोदी म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये सतत लक्ष ठेवून रणनीती आखणे आवश्यक आहे. केंद्र आणि राज्यांमध्ये सततच्या संवादाची गरज असून, त्वरित निर्णय घेण्यासाठी वेळोवेळी माहितीचे आदानप्रदान होणे आवश्यक आहे. 

आखाती देशांतील नागरिकांसाठी हेल्पलाईन

नागरिक आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या राज्यांनी त्यांच्या संपर्कासाठी हेल्पलाईन सुरू करावी. प्रत्येक राज्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची सूचना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. 

या बैठकीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Amit Shah), संरक्षणमंत्री राजनाथ सिंग ( Rajnath Singh) यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. 

 

हेही वाचा