
नवी दिल्ली : अमेरिका-इस्त्रायल- इराण (USA-Israel-Iran) यांच्यामधील यु्द्धाच्या संकटामुळे भारतीय (India) विमान कंपन्यांनी उन्हाळी वेळापत्रकात आठवड्याला ३,००० उड्डाणे कमी केली आहेत. गतवर्षीच्या तुलनेत २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी उन्हाळी वेळापत्रकात भारतीय विमान कंपन्या (Indian airlines) दर आठवड्याला सुमारे ३,००० उड्डाणे कमी चालवणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षीच्या तुलनेत, २९ मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी उन्हाळी वेळापत्रकात भारतीय विमान कंपन्या दर आठवड्याला सुमारे ३,००० उड्डाणे कमी चालवतील. पश्चिम आशियातील संकटामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे विमान कंपन्यांनी आपली क्षमता (capacity) कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी अद्याप क्षमता कपातीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
गतवर्षीच्या उन्हाळी वेळापत्रकात भारतीय विमान कंपन्यांनी २५,६१० साप्ताहिक उड्डाणे चालवली होती. ही संख्या २०२४ मधील २४,२७५ उड्डाणांपेक्षा अधिक होती. आता, २९ मार्चपासून लागू होणाऱ्या आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या उन्हाळी वेळापत्रकात ही संख्या कमी होऊन सुमारे २२,६०० साप्ताहिक उड्डाणांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
"गतवर्षी याच कालावधीत चालवण्यात आलेल्या उड्डाणांच्या तुलनेत, या उन्हाळ्यात सुमारे १२% कमी उड्डाणे चालवली जातील," असे या घडामोडींची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
वाढता परिचालन खर्च, विशेषतः इंधन आणि परकीय चलना संबंधित खर्च आणि पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव कायम राहिल्यास प्रवासाची मागणी कमी होण्याची भीती, या कारणांमुळे विमान कंपन्या आपली क्षमता कमी करत आहेत, असेही त्या अधिकाऱ्याने नमूद केले.
तर निर्बंध लागू होतील : नागरी वाहतूक मंत्रालय
दरम्यान, नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने डिसेंबरपासून लागू असलेली देशांतर्गत विमान भाड्यावरील तात्पुरती मर्यादा मागे घेतली आहे. ज्या परिस्थितीमुळे हे निर्बंध लागू करण्यात आले होते. ती आता स्थिर झाली असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. मात्र, अवाजवी दर आकारल्यास पुन्हा निर्बंध लागू केले जातील, असा इशाराही मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिला आहे.