
काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) शुक्रवारी ३५ वर्षीय बालेंद्र (बालेन) शाह यांनी पंतप्रधान (Prime Minister) पदाची शपथ घेतली. यासह ते देशाचे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. शपथविधीपूर्वी काही तास त्यांनी रॅप गाण्याद्वारे देशाला पहिला संदेश देत भ्रष्टाचारविरोध, प्रणालीत बदल आणि युवकांच्या सशक्तीकरणावर भर दिला. भारताचे पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नेपाळच्या नव्या पंतप्रधानाना शुभेच्छा दिल्या.
आपल्या गाण्यात बालेंद्र यांनी “एकता हीच सर्वात मोठी ताकद” असल्याचे सांगत देशात नवा इतिहास घडत असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (RSP) ने ५ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत २७५ सदस्यीय संसदेत १८२ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले.
कार्यवाहक पंतप्रधान सुशीला कार्की यांनी नव्या सरकारकडून भ्रष्टाचार निर्मूलनाची अपेक्षा व्यक्त करत “देशाचे भविष्य आता तरुणांच्या हाती आहे,” असे म्हटले.
दरम्यान, नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेलाही सुरुवात झाली असून सुधन गुरुंग यांची गृहमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील अंतर्गत सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. तसेच शिशिर खनाल यांच्याकडे परराष्ट्र खात्याची धुरा सोपवण्यात आली असून ते नेपाळचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत करण्याचे काम पाहतील.
मधेस क्षेत्रातून पहिल्यांदाच पंतप्रधान
बालेंद्र शाह हे यापूर्वी काठमांडूचे महापौर होते. त्यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्या पदाचा राजीनामा देत राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. ते मधेस (तराई) भागातून येणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. भारताच्या सीमेलगत असलेला हा भाग प्रतिनिधित्व आणि ओळख यांसाठी दीर्घकाळ चर्चेत राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीला राजकीय संतुलनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालेन शाह यांचे अभिनंदन करत भारत-नेपाळ मैत्री अधिक दृढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली. दोन्ही देशांमधील सहकार्य नव्या उंचीवर नेण्यासाठी एकत्र काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली.
नेपाळमध्ये राजकीय अस्थिरता आणि आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बालेन शाह यांच्यावर स्थिरता निर्माण करण्यासोबत रोजगारनिर्मितीचे मोठे आव्हान असेल. युवा नेतृत्वाकडून देशात सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.