जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : अचानक तपासणीत दृष्टीस पडल्यास कारवाई

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पेट्रोल पंपवाल्यांनी ग्राहकांना पेट्रोल वा डिझेल किरकोळ स्वरूपात कॅन किंवा बाटल्यांमधून विक्री करायाची नाही. विक्री करताना पेट्रोल वा डिझेल थेट वाहनाच्या टाकीत भरावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत. पेट्रोल पंपाची अचानक तपासणी केली जाणार आहे. यावेळी पेट्रोल वा डिझेल कॅन वा बाटल्यांमधून दिल्याचे दृष्टीस पडल्यास कारवाई केली जाणार आहे, असा इशाराही या आदेशातून दिला आहे.
दरम्यान, राज्यात पेट्रोल आणि डिझेल विक्रीची स्थिती सामान्य झाली आहे. शुक्रवारी पेट्रोल वा डिझेल खरेदीसाठी पंपांवर रांगा नजरेस पडल्या नाहीत. पेट्रोल आणि डिझेलचा साठा सर्व पेट्रोल पंपांवर उपलब्ध होता. पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाची टंचाई जाणवेल या भीतीने मागील काही दिवस लोकांनी पेट्रोल, डिझेल खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. बुधवार आणि गुरुवारी सर्वच पंपांवर मोठ्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे काही पंपांवरील पेट्रोलचा साठा लवकर संपला. राज्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे पेट्रोल संपलेल्या पंपांवरही शुक्रवारी पेट्रोल उपलब्ध झाले. तुटवड्याच्या भीतीने काही लोकांनी कॅन व बाटल्यांमधून पेट्रोलची खरेदी केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी आता बंदीचा आदेश जारी केला आहे.
कॅन वा बाटलीत पेट्रोल वा डिझेल ठेवणे धोकादायक असते. या पद्धतीने पेट्रोल, डिझेलची विक्री सुरूच ठेवल्यास इंधनाचा साठा करून ठेवला जाण्याची भीती असते. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि उपविभागीय दंडाधिकाऱ्यांमार्फत या आदेशाची कार्यवाही पार पाडली जाईल.