केरळमधून एकाला अटक : मयेतील एकाला २.४८ कोटींना गंडवले

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : जास्त व्याजाचे आमिष दाखवून गोव्यातील अनेकांना ‘ओरिस कॉईन’मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून २.४८ कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी गोवा पोलिसाच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) तरुण त्रिखा याच्यासह इतर तिघांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
आर्थिक गुन्हा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी मये-डिचोली येथील नीलेश अर्जुन कारबोटकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, नवी दिल्ली येथील तरुण त्रिखा, राहुल खुराना, महाराष्ट्र येथील रवी ठाकूर आणि राहुल जाधव यांनी तक्रारदारासह इतरांना जास्त व्याजाचे आमिष दाखवून ऑनलाईनद्वारे ‘ओरिस कॉईन’मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गोव्यातील अनेकांनी १ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२५ या कालावधीत सुमारे २ कोटी ४८ लाख रुपयांची गुंतवणूक केली. दरम्यान, ठरल्याप्रमाणे वरील संशयितांनी मोबदला दिला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीची दखल घेऊन ईओसीचे निरीक्षक तुकाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रमेश शिरोडकर यांनी वरील संशयितासह २२ एजंटांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५), ३१८, ६१(२), ३ व ५ गोवा गुंतवणूकदारांचे हितरक्षण कायदा व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
डिजिटल अरेस्टद्वारे एकाला ९० लाखांना ‘टोपी’
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ९०.८५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी गोवा सायबर विभागाच्या पोलिसांनी केरळहून मुहम्मद रसिक पुलिक्कल (२१) याला अटक केली. संशयिताचा गोव्यातील आणि कर्नाटकातील मिळून एकूण २.१० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सहभाग आहे.
तिसवाडी तालुक्यातील एका ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदाराला भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचा (ट्राय) आणि केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून ८५५२८४१६१५, ९९५७३५१८३२, ८४२१७९५८२५ आणि ७५२७९०१७६८ या व्हॉट्सअॅप क्रमांकांवरून कॉल करण्यात आला होता. कॉल करणाऱ्याने जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तक्रारदाराचा सहभाग असल्याचे सांगून गोयलकडून कमिशन घेतल्याचा आरोप केला होता. तक्रारदाराला २३ फेब्रुवारीपूर्वी ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे दबाव टाकण्यात आला. हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यांत ९० लाख ८५ हजार रुपये जमा करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सायबर विभागाने अज्ञात व्हॉट्सअॅप मोबाईलधारकाविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
याच दरम्यान केरळ येथील एका बँक खात्यात ५ लाखांची रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली. अधीक्षक राजू राऊत देसाई, साहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, कॉन्स्टेबल यश कोळे आणि सिद्धरमय्या मठ यांचे पथक केरळात रवाना करण्यात आले. पथकाने मुहम्मद रसिक पुलिक्कल (२१) या संशयिताला ताब्यात घेऊन गोव्यात आणले. संशयिताला अटक करून पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. कर्नाटक आणि गोवा येथील फसवणूक प्रकरणांत संशयित पुलिक्कलचा सहभाग उघड झाला आहे.
पोलिसांचे सतर्कतेचे आवाहन
नागरिकांनी अशा प्रकारच्या ‘डिजिटल अरेस्ट’, धमक्या किंवा संशयास्पद कॉल्सपासून सावध राहावे आणि आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खात्री करावी. कोणत्याही प्रलोभनाला, आमिषाला बळी पडू नये. सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.