वाळपई शिमगोत्सवातील रोमटामेळांतील वादप्रकरणी ८ दिवसांत अहवाल द्या!

पर्यटन खात्याकडून वाळपई नगरपालिकेला निर्देश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th March, 11:19 pm
वाळपई शिमगोत्सवातील रोमटामेळांतील वादप्रकरणी ८ दिवसांत अहवाल द्या!

वाळपई : वाळपई शिमगोत्सवातील रोमटामेळांतील वादप्रकरणी ८ दिवसांत अहवाल द्या, असे निर्देश पर्यटन खात्याकडून वाळपई नगरपालिकेला देण्यात आले आहेत.

गोवा पर्यटन खाते व गोवा पर्यटन महामंडळ तसेच सत्तरी शिमगोत्सव समिती यांच्यावतीने दि. १६ मार्च रोजी वाळपई येथे आयोजित करण्यात आलेल्या शिमगोत्सव मिरवणुकीदरम्यान आडपई व खांडेपार या दोन्ही रोमटामेळ पथकांमध्ये वाद निर्माण होऊन संभ्रमित परिस्थिती निर्माण झाली. या घटनेमुळे शिमगोत्सवाला गालबोट लागले असून महोत्सव समितीला नाहक समस्यांना सामोरे जावे लागले. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोन्ही पथकांवर आवश्यक ती कारवाई करण्याच्या उद्देशाने गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने पुढाकार घेतला आहे. खात्याने वाळपई नगरपालिकेकडे या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून आठ दिवसांत अहवाल सादर करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी की, गोवा पर्यटन महामंडळ, पर्यटन खाते व सत्तरी शिमगोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वाळपई येथे सोमवार, दि. १६ मार्च रोजी शिमगोत्सव मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास खांडेपार येथील रोमटामेळ पथक व आडपई येथील सुयोगट पथक यांच्यात वाद निर्माण झाला आणि परस्परांमध्ये मारहाण झाली. या संदर्भातील तक्रारी वाळपई पोलीस स्थानकात दाखल करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा