ब्रह्मानंद नाईक याचा गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू

फोंडा : वाडी-तळावली येथे दि. २१ मार्च रोजी पूर्ववैमनस्यातून कारची धडक स्कुटरला दिल्याने गंभीर जखमी झालेल्या ब्रह्मानंद नाईक (सोसेभाट - आडपई) याचा गोमेकॉत उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला. फोंडा पोलिसांनी यापूर्वीच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कारचालक लवूनाथ नाईक (४४, वाडी- तळावली) याला अटक केली होती. त्याला न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
वाडी- तळावली रस्त्यावरून जाताना कार चालकाने मुद्दामहून स्कुटरला धडक देऊन ब्रह्मानंद नाईक याला गंभीर जखमी केली होते. तसेच स्कुटर चालकाला आपण मुद्दामहून धडक दिल्याचे सांगितले होते, असा जबाब पोलिसांनी नोंद केला होता. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कार चालकाला अटक केली होती. स्कुटर चालकावर गोमेकॉत गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. परंतु, शुक्रवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला संशयित लवूनाथ नाईक हा बांधकाम खात्याचा कर्मचारी आहे. अटक केलेल्या संशयिताला न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश पोलिसांना दिला आहे.
जखमीचा शुक्रवारी सकाळी उपचार सुरू असताना मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे या प्रकरणी तपास करीत आहेत.
मृत झालेल्या ब्रह्मानंद नाईक याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व भाऊ असा परिवार आहे. संध्याकाळी स्थानिक स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आडपई येथे जाऊन मृतदेहाचे अंतिम दर्शन घेतले.