ओशेल शिवोलीत २५ लाखांचा मॅजिक मशरूम ड्रग्ज जप्त

हणजूण पोलिसांकडून फ्रेंच महिलेला अटक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
2 hours ago
ओशेल शिवोलीत २५ लाखांचा मॅजिक मशरूम ड्रग्ज जप्त

म्हापसा : ओशेल-शिवोली येथे हणजूण पोलिसांनी छापा टाकून २५.१५ लाखांचा दोन किलो मॅजिक मशरूम हा ड्रग्ज जप्त केला. याप्रकरणी गॅएल लुईस डॅनिएल पॅव्हिलॉन (४३) या फ्रेंच नागरिक महिलेला अटक केली. संशयित महिला ही गुबालवाडो ओशेल येथील ट्रॉपिकल ड्रिम्स अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होती.

हणजूण पोलिसांनी ही कारवाई गुरुवार, दि. २६ रोजी रात्री केली. आराडी, ओशेल शिवोली येथील स्मशानभूमीजवळ ड्रग्जचा विक्री व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला व घटनास्थळी दुचाकीवरून आलेल्या संशयित महिलेला पकडले.

झडतीवेळी जीए ०३ एयू ६७२० क्रमांकाच्या फसिनो स्कूटरमध्ये ३.१५ लाख रुपये किमतीचे १३६ ग्रॅम वजनाचे सिलोसिबिन हे वाळलेले मॅजिक मशरूम आणि ३७ पारदर्शक पाकिटांमध्ये असलेले २२ लाखांचे १ किलो ८११ ग्रॅम मॅजिक मशरूम चॉकलेट्स सापडले. या ड्रग्जची एकूण किंमत २५ लाख १५ हजार रुपये आहे.

पोलिसांनी हा ड्रग्ज जप्त करून संशयित महिलेविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २२(सी) अन्वये गुन्हा नोंदवून तिला शुक्रवारी पहाटे अटक केली. महिलेला म्हापसा न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लीशा गारुडी या करीत आहेत.

हेही वाचा