केळशी येथे विजेच्या पॅनेलवर स्कूटर आदळून एकाचा मृत्यू

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
9 mins ago
केळशी येथे विजेच्या पॅनेलवर स्कूटर आदळून एकाचा मृत्यू

वास्को : केळशी येथे बुधवारी रात्री विजेच्या वितरण पॅनेलवर स्कूटर आदळल्याने जीवन नाईक (४८, आगापूर-दुर्भाट) यांचा मृत्यू झाला.

केळशीहून आपल्या घरी परतत असताना, केळशीमधील उद्दो येथे हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक यांचे त्यांच्या स्कूटरवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या पॅनेलवर जाऊन आदळली. नाईक यांना सुरुवातीला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला आणि मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉकडे पाठवला. अहवालात मृत्यूचे कारण जोरदार आघात झाल्यामुळे छातीला बसलेला गंभीर धक्का, परिणामी झालेला रक्तस्राव आणि शॉक असे नमूद करण्यात आले आहे.

वैद्यकीय-कायदेशीर सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर, मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

वेर्णा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १९४ अन्वये अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीखाली आणि मुरगाव विभागाचे उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक महेश भोमकर प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.