बनावट आरोग्य दाखलाप्रकरणी लुथरा बंधूंना अटकपूर्व जामीन नाकारला

डॉ. रोशन नाझारेथ यांनी दाखल केली होती तक्रार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th March, 10:48 pm
बनावट आरोग्य दाखलाप्रकरणी लुथरा बंधूंना अटकपूर्व जामीन नाकारला

म्हापसा : अबकारी खात्याचा उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यासाठी कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचा बनावट आरोग्य दाखला तयार केल्याप्रकरणी म्हापसा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने बर्च क्लबचे मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.

शुक्रवार, २७ रोजी न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी हा निकाल दिला. सरकारी पक्षाने सुनावणीवेळी गुन्ह्याचे गांभीर्य आणि तपासाची व्याप्ती लक्षात आणून दिल्याने न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत दोन्ही संशयित आरोपींना कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्यांचा अर्ज नामंजूर केला.

दरम्यान, न्यायालयाच्या निवड्यानंतर बोलताना लुथरांच्या वकिलांनी सांगितले की, अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होईल, अशी आम्हाला आशा होती, कारण यापूर्वीही आमच्या अशिलांनी तपासात सहकार्य केले आहे. सविस्तर निकालाची प्रत मिळाल्यावर पुढील निर्णय घेतला जाईल.

दरम्यान, कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. रोशन नाझारेथ यांनी म्हापसा पोलिसांत दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी या बनावट एनओसी संदर्भात तक्रार दाखल केली होती. हा प्रकार १३ डिसेंबर पूर्वी अबकारी खात्याच्या म्हापसा निरीक्षक कार्यालयात घडला होता. बर्च आग दुर्घटना प्रकरणाच्या पोलीस चौकशीवेळी संशयितांचा हा बनावटगिरी व फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर जीएस हॉस्पिलिटी एलएलपी या कंपनीसह कंपनीचे अधिकृत मालक असलेले सौरभ लुथरा, गौरव लुथरा व अजय गुप्ता यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या ३३२(२), ३३६(३), ३३८, ३४०(२), ३१८(४) व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केला होता.

दरम्यान, साकवाडी हडफडे येथील सर्व्हे क्र. १५९/० मधील घर क्रमांक ५०२/१ मध्ये चालणार्‍या जीएस हॉस्पिलिटी एलएलपी कंपनीच्या आस्थापनासाठी उत्पादन शुल्क परवाना मिळवण्याच्या उद्देशाने संशयित आरोपींनी समान हेतूने जाणूनबुजून आणि अप्रामाणिकपणे कांदोळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) तयार केले. ज्यात संशयितांनी फिर्यादींची नक्कल करून बनावट सही केली व रजिस्टरमधील बनावट नोंदीचा वापर केला. नंतर हा बनावट दाखला खरा असल्याचे भासवून तो उत्पादन शुल्क खात्याकडे सादर केला. जेणेकरून उत्पादन शुल्क परवान्यासाठी कागदोपत्री व्यवहार पूर्ण करता येईल आणि संशयित आरोपी हे हा उत्पादन शुल्क परवाना मिळवण्यात यशस्वी झाले होते.

बनावटगिरी, फसवणुकीचा गुन्हा नोंद

फिर्यादी तसेच अबकारी अधिकार्‍यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली म्हापसा पोलिसांनी बनावटगिरी आणि फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्यात अटक होऊ नये म्हणून संशयितांनी न्यायालयात धाव घेतली होती. 

हेही वाचा