इन्स्टाग्रामवर मैत्री; दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाला अटक


2 hours ago
इन्स्टाग्रामवर मैत्री; दुसऱ्याच दिवशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : आदल्या दिवशी इन्स्टाग्रामवर मैत्री केली आणि दुसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पणजी महिला पोलिसांनी बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पणजी महिला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी तिसवाडी तालुक्यातील १७ वर्षीय मुलीने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, बार्देश तालुक्यातील २३ वर्षीय युवकाने ८ मार्च रोजी तिच्याशी इन्स्टाग्रामवरून मैत्री केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे ९ मार्च रोजी ते दोघे भेटले. त्यावेळी युवकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार, पणजी महिला पोलीस स्थानकाचे निरीक्षक मीरा डिसिल्वा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रूपाली गोवेकर यांनी सदर युवकाविरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सदर युवकाला अटक केली. अटक करण्यात आलेल्या युवकाला पणजी येथील ‘पाेक्सो’ न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर संशयित युवकाला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. दरम्यान, संशयित युवकाने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.