नेपाळात मोठी राजकीय घडामोड: माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना अटक

माजी गृहमंत्री रमेश लेखक यांनाही अटक

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
15 mins ago
नेपाळात मोठी राजकीय घडामोड: माजी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना अटक

काठमांडू : नेपाळच्या (Nepal ) राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून, माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली (KP Sharma Oli) यांना अटक करण्यात आली आहे. नवे पंतप्रधान बालेंद्र शाह (Balendra Shah) यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात ही कारवाई करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

नेपाळ पोलिसांनी (Nepal police)  भकतपूरमधील गुंडू येथील त्यांच्या निवासस्थानातून शनिवारी सकाळी ओली यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत माजी गृहमंत्री रमेश लेखक ( Ramesh Lekhak) यांनाही अटक करण्यात आली आहे.

काठमांडू व्हॅली पोलिसांचे प्रवक्ते ओम अधिकारी यांनी सांगितले की, “दोघांना आज सकाळी अटक करण्यात आली असून, पुढील प्रक्रिया कायद्यानुसार पार पडेल.”

‘कायद्यापुढे कोणीही मोठे नाही’ : सरकारचा ठाम संदेश

अटकेनंतर नव्याने नियुक्त गृहमंत्री सुदन गुरुंग ( Sudan Gurung)  यांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली. “दिलेला शब्द पाळला जाईल. कायद्यापुढे कोणीही मोठे नाही. ही सूडभावनेतून केलेली कारवाई नसून न्यायाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे,” असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले.

ओलींचा आरोप: ‘सूडबुद्धीने अटक’

दरम्यान, माजी पंतप्रधान ओली यांनी ही अटक सूडबुद्धीने केल्याचा आरोप केला आहे. “मी कायदेशीर लढा देणार,” असे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

‘Gen Z’ आंदोलनाचा संदर्भ

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या भ्रष्टाचारविरोधी ‘Gen Z’ आंदोलनात ७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.  त्यात किमान १९ तरुणांचा मृत्यू झाला होता. सोशल मीडियावरील तात्पुरत्या बंदीच्या निषेधातून सुरू झालेले हे आंदोलन देशभर पसरले. संसद व सरकारी इमारतींना आग लावण्यात आली होती. या हिंसाचारानंतर ओली सरकार कोसळले होते.

या पार्श्वभूमीवर झालेली ही अटक नेपाळच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात मानली जात आहे.

हेही वाचा