सायबर पोलिसांची कारवाई; तिघांची मिळून २.१० कोटींची फसवणूक

पणजी : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ९०.८५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा सायबर क्राइम पोलिसांनी एकाला अटक केली. याप्रकरणी पथकाने मुहम्मद रसिक पुलिक्कल ( २१ वर्षे) याला अटक केली. अशाच प्रकारे गोवा व कर्नाटक मिळून आणखी दोघांची फसवणूक करण्यात आली आहे. फसवणुकीची एकूण रक्कम २.१० कोटी रुपये आहे.
पणजी येथील एकाने केलेल्या तक्रारीनुसार आरोपीने व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधत स्वतःला ‘टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया’ (TRAI) आणि सीबीआयचे (मुंबई) अधिकारी असल्याचे भासवले. तक्रारदाराने वैयक्तिक माहितीचा गैरवापर केल्याचा खोटा आरोप करत, त्याचा संबंध एका उद्योगपतीच्या संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणाशी जोडल्याची बतावणी करण्यात आली. तसेच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली दबाव टाकून प्रकरण मिटवण्यासाठी मोठी रक्कम भरण्यास भाग पाडण्यात आले.
या फसवणुकीत संशयिताने तक्रारदाराकडून एकूण ९०.८५ लाखांची रक्कम उकळली. तांत्रिक तपासादरम्यान पोलिसांनी संशयिताचा माग काढत केरळमधील मलप्पुरम येथे कारवाई करून अटक केली. आरोपीच्या बँक खात्यात ५ लाखांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम नंतर इतर सहकाऱ्यांच्या खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे तपासात उघड झाले.
आणखी दोघांची फसवणूक; एकूण रक्कम २.१० कोटींहून अधिक
पुढील तपासात अशाप्रकारे कर्नाटक आणि गोवा येथील आणखी दोघांची सायबर फसवणूक केल्याचे उघड झाले. एकूण फसवणुकीची रक्कम २.१० कोटींहून अधिक आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी बीएनएस कलम ३१८(४), ३१९(२) तसेच आयटी कायद्याच्या कलम ६६-डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशा फसवणुकीला बळी पडू नका
नागरिकांनी अशा प्रकारच्या ‘डिजिटल अरेस्ट’, धमक्या किंवा संशयास्पद कॉल्सपासून सावध रहावे आणि आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.