एसजीपीडीए मार्केटचा वापर केवळ 'कमिशन' खाण्यासाठी; आमदार विजय सरदेसाईंची टीका

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th March, 01:11 pm
एसजीपीडीए मार्केटचा वापर केवळ 'कमिशन' खाण्यासाठी; आमदार विजय सरदेसाईंची टीका

मडगाव: मडगाव येथील एसजीपीडीए (SGPDA) मार्केटमध्ये कमालीची अस्वच्छता असून, केवळ 'हप्ते' खाण्यासाठी नव्या इमारतीचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले आहे, अशी घणाघाती टीका आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. सरकार आणि त्यांचे भागीदार मार्केटमधून पैसे लाटत असून सोपो ठेकेदार रस्त्याशेजारील विक्रेत्यांची लूट करत आहेत. स्वच्छतेचे कंत्राट फातोर्डाबाहेरील व्यक्तीला देण्यात आला असून तो तातडीने रद्द करावा, अन्यथा सर्व गैरप्रकार चव्हाट्यावर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.

फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी सकाळी एसजीपीडीए मार्केट परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक नगरसेवक जॉन फ्रान्सिस आग्नेलो आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते. मार्केटच्या दुरवस्थेबद्दल बोलताना सरदेसाई म्हणाले की, एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केट पूर्णपणे अनियोजित पद्धतीने सुरू आहे. नव्या इमारतीचे काम पूर्ण होऊनही केवळ कमिशनसाठी तिचे उद्घाटन केले जात नाही. परिणामी, मासळी विक्रेत्यांना घाणीत बसून व्यापार करावा लागत आहे.

मार्केटच्या स्वच्छतेसाठी निविदा काढण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र एसजीपीडीएचे अध्यक्ष दाजी साळकर यांनी अडीच लाख रुपयांचे हे काम भाजप समर्थक असलेल्या प्रथमेश नामक व्यक्तीला दिले आहे. तरीही मार्केटमध्ये स्वच्छता होत नाही. सत्ताधारी भाजप पक्ष या मार्केटचा वापर केवळ पैसे खाण्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मार्केटबाहेर बसणाऱ्या विक्रेत्यांकडून सोपो ठेकेदार बेकायदेशीरपणे पैसे उकळत आहेत. हे काम सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना न देता त्रासाला सामोरे जाणाऱ्या स्थानिक फातोर्डावासियांना मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. तसे न झाल्यास मार्केट दुसरीकडे स्थलांतरित करावे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

रस्त्याच्या साईडपट्टीसाठी मातीचा भराव

एसजीपीडीए मार्केटनजीकच्या शेतजमिनीत भराव टाकला जात असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या संदर्भात सरदेसाई यांनी पाहणी केली असता, रस्त्याच्या कडेला असलेल्या साईडपट्टीच्या दुरुस्तीसाठी ही माती आणल्याचे ठेकेदाराने स्पष्ट केले. मंत्री दिगंबर कामत यांनी हे काम दिले असून, वाहने रस्त्याखाली उतरू नयेत यासाठी ही दुरुस्ती केली जात आहे. यावेळी सरदेसाई यांनी ठेकेदाराला पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटारांची निर्मिती करण्याच्या सूचनाही दिल्या.


हेही वाचा