गेल्या काही दिवसांतील भूराजकीय, धोरणात्मक आणि इतर वेगवान घडामोडींमुळे ओढवली आणीबाणी

पणजी: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईच्या अफवेने संपूर्ण गोव्यात घबराट पसरली आहे. भविष्यात पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, या भीतीपोटी नागरिकांनी पेट्रोल पंपांवर प्रचंड गर्दी केल्यामुळे आठवडाभराचा साठा अवघ्या तीन दिवसांत संपुष्टात आला आहे. या अनपेक्षित मागणीमुळे पेट्रोल पंप चालकांचे संपूर्ण गणित बिघडले असून उत्तर गोव्यातील बहुतांश प्रमुख पंपांवरील साठा संपल्याने ते बंद ठेवण्याची वेळ आली आहे. सद्यस्थितीत केवळ पेडणे तालुक्यातील धारगळ येथील पंपावर पेट्रोल उपलब्ध असून तिथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी काल मंत्रिमंडळाच्या मंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देखील एकंदरीत स्थिती स्पष्ट केली होती. पण, लोक सध्या पॅनिक मोडमध्ये गेल्याचे दिसत आहेत.
मुळात दर दिवशी पेट्रोल आणि डिजेलची किती विक्री होईल याचा हिशेब पक्का असतो. इंधनाचा साठा ठराविक मर्यादेपेक्षा कमी झाला तर तो रिफील केला जातो. क्वचितच एमर्जन्सी आलीच तर त्यासाठी देखील वेगळी व्यवस्था असते. आता जो काही साठा आठ दिवस चालेल असा हिशेब करून पेट्रोल पंप चालकांनी रिफील केला होता, तो साठा केवळ तीन दिवसांतच संपला आहे. गेल्या काही दिवसांतील भूराजकीय, धोरणात्मक आणि इतर वेगवान घडामोडींमुळे आणीबाणी स्थिती ओढवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावल्याने नागरिक 'पॅनिक मोड'वर गेले आहेत. कळंगुट, बागा आणि मिरामार यांसारख्या किनारी भागांत इंधनासाठी वाहनांच्या रांगा रस्त्यावर आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली आहे. शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील पर्यटकांनीही स्वस्त इंधनाच्या आमिषाने कॅन भरून साठा करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, गोवा पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे की, राज्यात इंधनाची कोणतीही टंचाई नाही. डेपोमध्ये सात ते आठ दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध असून केवळ नागरिकांच्या अतिघाईमुळे काही पंपांवरील साठा तात्पुरता संपला आहे.
या इंधन संकटाचा मोठा फटका कदंब महामंडळालाही बसला आहे. तेल कंपन्यांकडून थेट मिळणारे डिझेल प्रति लिटर ११० रुपये पडत आहे, तर बाहेर पंपावर ते ८८.२० रुपये आहे. या दरातील तफावतीमुळे कदंब बस चालक स्वस्त डिझेलसाठी बाहेरील पंपांवर रांगा लावत आहेत, परिणामी बस वेळेत पोहोचण्यास विलंब होत असून पणजी बसस्थानकावर प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
दुसरीकडे, उत्तर-दक्षिणेतील किनारी भाग, पणजी-मडगांव-वास्कोसह राज्यभरात अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या केवळ २० टक्के कोटा पुरवला जात असल्याने हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. गॅसअभावी अनेक रेस्टॉरंटनी आपले मेन्यू मर्यादित केले असून काही ठिकाणी पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात झाली आहे. काळ्या बाजारात एका सिलिंडरसाठी पाच ते सात हजार रुपयांची मागणी होत आहे. नागरी पुरवठा खात्याने कडक पावले उचलून काळा बाजार रोखण्याचा प्रयत्न केला असला, तरी गॅस पुरवठा सुरळीत नसल्याने पर्यटन हंगामात हॉटेल उद्योगासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.