ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; लवकरच पर्यायी योजना

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : स्थानिकांचा तीव्र विरोध लक्षात घेऊन मिराबाग येथील प्रस्तावित बंधारा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. बंधारा व जलसाठा योजना रद्द करून पिण्याच्या पाण्यासाठी उपसा करण्याचा पर्याय ग्रामस्थांसमोर मांडण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ही माहिती देण्यात आली. या बैठकीला आंदोलकांचे शिष्टमंडळ, माजी राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि दामू नाईक उपस्थित होते. मिराबाग येथे बंधारा उभारण्यासाठी निविदा काढून काम सुरू करण्याची प्रक्रिया जलस्रोत खात्याकडून सुरू करण्यात आली होती. मात्र स्थानिकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवत आंदोलन छेडले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच आंदोलन सुरू झाले होते.
सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला यश आले नाही. त्यानंतर सरकारने प्रकल्पाचे काम स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला असून पर्यायी योजना राबवण्याबाबत चर्चा सुरू आहे. आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती विनय तेंडुलकर यांनी दिली.