कळंगुटमध्ये गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी आंदोलन

पुरवठा सुरळीत करण्याचे गॅस एजन्सीचे आश्वासन


25th March, 11:26 pm
कळंगुटमध्ये गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी आंदोलन

कळंगुट टिटो येथे गॅस एजन्सीच्या बाहेर पोलीस जीपला जमावाने घातलेला गराडा.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : कळंगुटमध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जात नसल्याच्या निषेधार्थ कळंगुटवासीयांनी एचपी गॅस एजन्सीसमोर रिकाम्या सिलिंडरसह ठिय्या आंदोलन केले. गॅस एजन्सींच्या कर्मचार्‍यांना सुरक्षितस्थळी हलवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला असता आंदोलकांनी पोलीस जीप अडवल्यामुळे याठिकाणी काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
बुधवारी सकाळी कळंगुट टिटो जंक्शन येथे सरपंच जोजफ सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी आंदोलन केले. आंदोलनात ग्रामस्थांसह पंच आणि कळंगुट गट समितीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. १५ दिवस गॅस बुकिंग करूनही सिलिंडरचा पुरवठा केला जात नाही. एजन्सीच्या मालकाने सोमवारपासून घरपोच पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे सरपंच सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ रिकाम्या सिलिंडरसह गॅस एजन्सीसमोर एकत्र झाले. त्यावेळी एजन्सीमध्ये दोन कर्मचारी होते. एजन्सी मालकाने आम्हाला सिलिंडरचा पुरवठा करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
मोठ्या संख्येने ग्रामस्थ जमल्यामुळे पोलिसांनी एजन्सीच्या कर्मचार्‍यांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी पोलीस जीपमध्ये बसवले. त्यावेळी जमावाने पोलिसांना जाब विचारला आणि ठिय्या मांडून जीप अडवली. त्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुपारी पंचायत घरात संयुक्त बैठक झाली. सरपंच सिक्वेरा, आमदार मायकल लोबो, पोलीस आणि मामलेदार यांच्या उपस्थितीत बुकिंगनुसार सिलिंडरचा पुरवठा करण्याचे आश्वासन एजन्सीचे मालक मंगेश तेली यांनी दिले. त्यानंतर आंदोलक माघारी परतले.
कळंगुटमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमित होत नाही. गॅस एजन्सीच्या मालकाने आश्वासन देऊनही आठवडा उलटला तरी सिलिंडरचा पत्ता नाही. राज्यभर समस्या असल्याचे सांगून पोलिसांनी गॅस एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यास मनाई केली. त्यामुळे आम्हाला ग्रामस्थांच्या आग्रहास्तव रस्त्यावर उतरावे लागले.
_ जोजफ सिक्वेरा, सरपंच, कळंगुट

अफवांमुळे मडगावात पेट्रोलपंपांवर रांगा
पेट्रोलचा साठा कमी असून उद्यापासून पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवांमुळे मडगाव व कोलवा परिसरात मंगळवारी रात्री पेट्रोलपंपांवर रांगा पाहावयास मिळाल्या. रात्री २ नंतरही कोलवा येथील पेट्रोलपंपावर दुचाकी व कारचालकांची मोठी गर्दी होती. मनुरा पेट्रोलपंपाचे मालक दीपक यांनी सांगितले की, अफवांवर विश्वास ठेवून वाहनचालकांनी इंधन भरण्यासाठी पेट्रोलपंपावर रांगा लावल्या आहेत. त्यांना आपण इंधनाचा पुरेसा साठा असून सर्वांना पेट्रोल मिळेल, कुठेही तोटा नसल्याचे सांगितले. इंधनाच्या किमतीत वाढ झालेली नाही. लॉकडाऊन होऊन किमतीत वाढ होईल, इंधन तुटवडा होईल, अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये.


युद्धाच्या पार्श्वभूमीवर सत्तरीतही इंधन तुटवड्याची भीती
इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. युद्धामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीती सर्वत्र व्यक्त होत आहे. या भीतीपोटी सत्तरी तालुक्यातील वाळपई आणि नाणूस पेट्रोल पंपांवर वाहनचालकांनी इंधन भरण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सकाळपासूनच दोन्ही पंपांवर रांगा लागल्या होत्या. इंधन तुटवड्याबाबत अधिकृतरीत्या कोणतीही घोषणा झालेली नसली, तरी अफवा आणि भीतीमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा