वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप : मर्यादा पाळण्याच्या नगराध्यक्षांच्या सूचनेकडे दुर्लक्ष

म्हापसा पालिका मंडळाच्या बैठक इतिवृत्त मंजुरीच्या विषयावरून नगरसेवकांमध्ये सुरू असलेली खडाजंगी. (उमेश झर्मेकर)
प्रतिनिधी। गोवन
म्हापसा : विद्यमान पालिका मंडळाच्या शेवटची सर्वसाधारण बैठक गोंधळाच्या वातावरणात पार पडली. मागील बैठकीचे इतिवृत्त मंजूर करण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी गटातीलच नगरसेवक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने गदारोळ माजला. एकमेकांवर वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, असंसदीय शब्दांचा वापर करण्यात आला.
बुधवारी नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक तब्बल सहा तास दोन सत्रांत चालली. यावेळी मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट व नगरसेवक, लेखा तथा प्रशासकीय अधिकारी, पालिका अभियंता उपस्थित होते. चर्चेवेळी नगरसेवकांनी एकमेकांवर केलेली वैयक्तिक टीका ऑन रेकॉर्ड घेतली जाणार नाही. सर्वांनी मत मांडताना मर्यादा पाळावी, अशी सूचना नगराध्यक्षांनी केली; मात्र नगरसेवकांकडून त्याचे पालन झाले नाही.
बैठकीत रक्ताच्या नात्यातील दुकान हस्तांतरणाच्या विषयावरून उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट आणि साईनाथ राऊळ यांच्यात वादाची ठिणगी पडली. मागील बैठकीत या विषयावर झालेली चर्चा आणि नोंदवलेले महत्त्वाचे मुद्दे उपनगराध्यक्षांच्या सांगण्यावरून लघुलेखकाने जाणीवपूर्वक वगळल्याचा गंभीर आरोप राऊळ यांनी केला. संबंधित महिला लघुलेखकाने उपनगराध्यक्षांनी तसे करण्यास सांगितल्याचा दावा केल्याने हा विषय अधिकच चिघळला. तारक आरोलकर, शशांक नार्वेकर, शुभांगी वायंगणकर, नूतन बिचोलकर, कमल डिसोझा यांनीही या वादात उडी घेत भिवशेट यांच्यावर निशाणा साधला. उपनगराध्यक्ष आपला खासगी अजेंडा राबवत असून इतिवृत्तात फेरफार करून कायद्याचे उल्लंघन करत आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी चुकीचा पायंडा पाडत आहेत, असा आरोप नगरसेवकांनी केला.
सायंकाळच्या सत्रात राऊळ आणि भिवशेट यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक झडली. या गोंधळात काही नगरसेवकांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्नही केला.
बैठकीत मंजूर झालेले ठराव
या बैठकीत आराम सोडा इमारतीत नगरनियोजन खात्याच्या उत्तर गोवा कार्यालयाला जागा देणे, पंधराव्या वित्त आयोग निधीतून ५०० कचरा कुंड्या घेणे, ३४.७५ लाख रुपये खर्चून टॅक्सी स्टँण्डचे नूतनीकरण करणे यासारखे महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले.