
पणजी: आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि संभाव्य टाळेबंदीच्या अफवांनी संपूर्ण गोव्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठी एकच गर्दी केली आहे. या 'पॅनिक बाइंग'मुळे अनेक पंपांवरील साठा काही काळासाठी संपुष्टात आल्याने गोंधळ उडाला असला, तरी प्रत्यक्षात राज्यात इंधनाचा तुटवडा नसल्याचे गोवा पेट्रोल डीलर्स असोसिएशनने स्पष्ट केले आहे. संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर यांनी जनतेला आश्वस्त केले आहे की, मुरगाव बंदरात कालच तेलवाहू जहाज दाखल झाल्याने राज्याचा इंधन साठा आता पुढील १५ दिवसांपर्यंत वाढला आहे.
गेल्या २४ तासांपासून नागरिकांनी गरजेपेक्षा जास्त इंधन खरेदी करण्यास सुरुवात केल्याने पंपांचे गणित बिघडले आहे. एका सामान्य पेट्रोल पंपावर दिवसाला सरासरी ९ हजार लिटर पेट्रोल आणि ३ हजार लिटर डिझेलची विक्री होते. मात्र, भीतीपोटी नागरिकांनी ही खरेदी अनुक्रमे साडेअकरा हजार आणि साडेसहा हजार लिटरपर्यंत नेली आहे. यामुळे काही पंपांवर पेट्रोल तात्पुरते संपले असून, तिथे केवळ डिझेल उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी साठा संपला आहे, तिथे टँकरद्वारे पुन्हा भरणा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. झुआरी सांकवाळे येथील टाक्यांमध्येही मुबलक साठा असून दर आठवड्याला नवीन जहाजे येणार असल्याने टंचाईचे कोणतेही कारण नाही.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आधीच आठ दिवसांचा साठा होता, जो आता नवीन जहाज आल्याने १५ दिवसांवर पोहोचला आहे. पुढील आठवड्यात दुसरे जहाजही दाखल होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन साठेबाजी करू नये. पंपावर इंधन संपले असल्यास ते केवळ टँकर येईपर्यंतच्या काही तासांसाठीच बंद आहे, कायमस्वरूपी नाही. इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असून ग्राहकांनी अफवांकडे दुर्लक्ष करून संयम पाळावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.