
नवी दिल्ली : इंडिगो कंपनीच्या विमानाचे शनिवारी (IndiGo) इंजिनमध्ये बिघाड झाल्याने दिल्ली (Delhi) विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. या घटनेत विमानातील सर्व १६१ प्रवासी सुखरूप असून; कोणतीही हानी झालेली नाही, अशी माहिती अधिकारिणीने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, बोईंग ७३७ (Boeing 737) प्रकारातील ६ई५७९ (6E 579) हे विमान आंध्र प्रदेशातील (Andra Pradesh) विशाखापट्टणमहून दिल्लीकडे (Delhi) येत होते. लँडिंगपूर्वीच इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आल्याने विमान उतरवण्यात आले.
सकाळी १०:५४ वाजता अग्निशमन दलाला आपत्कालीन लँडिंगची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन बंब घटनास्थळी रवाना करण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितरीत्या विमानातून बाहेर काढण्यात आले.
इंडिगो कंपनीने दिलेल्या निवेदनात सांगितले की, ही बाब लक्षात येताच मानक कार्यपद्धतीनुसार (SOP) आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आणि विमान सुरक्षितरीत्या उतरवण्यात आले. संबंधित यंत्रणांना त्वरित माहिती देण्यात आली असून; सध्या विमानाची तपासणी आणि देखभाल सुरू आहे.
दरम्यान, संबंधित विमान हे तुर्कीच्या कोरेंडन (Corendon Airlines) कंपनीकडून ‘वेट-लीज’ तत्त्वावर इंडिगोकडे देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीकडे अशा प्रकारची पाच विमाने अल्पकालीन वापरासाठी उपलब्ध आहेत.