उत्तर गोव्यात पर्यटकांना छेडण्याचे, त्यांना मारहाण करण्याचे प्रकार रोज घडत आहेत. हे प्रकार थांबले नाहीत तर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची अधोगती ठरलेली आहे. वेळीच सरकारने यात लक्ष घालून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना ठोस निर्देश द्यायला हवेत.

मागील काही वर्षांपासून गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी सुरूच आहे. काही वेळा ही बदनामी ‘पेड इन्फ्ल्यूएन्सर’द्वारे केली जाते, तर काही वेळा गोव्यातील व्यावसायिकांकडून पर्यटकांना मिळणाऱ्या वाईट वागणुकीमुळे राज्याची प्रतिमा मलीन होत आहे. किनारी भागांत पर्यटकांना मारहाण झाल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. शॅक, नाईट क्लब, पब आणि रेस्टॉरंट्स अशा सर्वच ठिकाणी पर्यटकांची लूट आणि त्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत. इतकेच नव्हे, तर पर्यटकांचा खून करण्यापर्यंतचे गंभीर गुन्हे गोव्यात गेल्या काही वर्षांत घडले आहेत. दुसऱ्या बाजूला, अशा माजलेल्या शॅक, क्लब मालकांवर सरकार कारवाई करते, परंतु त्यातून इतरांना जरब बसत नाही. एकाने चूक केली की दुसराही तीच चूक करतो, परिणामी किनारी भागातील पर्यटकांना मारहाण करण्याचे प्रकार सुरूच आहेत. ते थांबत नाहीत.
सरकारकडून होत असलेली कारवाई ही तात्पुरत्या स्वरुपाची असल्यामुळे मारहाण करणारेही घाबरत नाहीत. फारतर परवाना निलंबित होऊन तो परत मिळेल, याची खात्री त्यांना असते. राजकीय नेत्यांशी संधान बांधलेल्या अशा व्यावसायिकांमुळे गोव्याचे पर्यटन क्षेत्र गेल्या काही वर्षांपासून बदनाम होतच राहिले. गोव्याची बदनामी करण्यासाठी आता ‘पेड इन्फ्ल्यूएन्सर’ची गरज नाही, इथले व्यावसायिक आणि त्यांचे कर्मचारीच त्यासाठी पुरेसे आहेत. कधी टॅक्सीच्या भाड्यावरून, कधी अॅपवरून टॅक्सी बोलावली म्हणून, कधी पबमध्ये दारूच्या विषयावरून तर कधी रेस्टॉरंटमध्ये अन्न चांगले मिळाले नाही म्हणून, तर कधी बिल वाढवून दाखवले म्हणून पर्यटकांशी हुज्जत घालून त्यांना प्राणघातक मारहाण केली जाते. मसाजच्या नावाखाली पर्यटकांची लूट होते, मुली पुरवण्यापासून ते ड्रग्ज पुरवण्यापर्यंतचे लुटीचे धंदे गोव्याच्या किनारी भागांत सुरू आहेत. रोज पर्यटकांच्या तक्रारी येत असतात, पण पोलिसांनाही आता प्रकरणे मिटवण्याची आणि समेट घडवून आणण्याची सवय झाल्यामुळे अनेक पर्यटकांना न्याय मिळण्याआधीच प्रकरण गुंडाळले जाते. किनारी भागात पोलीस नियुक्त असतात, पण तिथे त्यांच्या उपस्थितीत पर्यटकांना मारहाण केली जाते. नियुक्त केलेले पोलीस पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आहेत की, तिथल्या स्थानिक व्यावसायिकांच्या पे-रोलवर आहेत, तेच कळायला मार्ग नसतो.
किनाऱ्यांवर परवाने नसताना हवे तेवढे बाकडे घालून पर्यटकांकडून खुलेआम लूट होत असते. भरतीचे पाणी जिथपर्यंत पोहोचते, तिथपर्यंत नियमबाह्यरीत्या बाकडे मांडणाऱ्या शॅक मालकांवर पोलीसही कारवाई करत नाहीत आणि पर्यटन खातेही त्यांना काही विचारत नाही. त्यातूनच पर्यटकांशी भांडणे होतात आणि शेवटी शॅकचे कर्मचारी मिळून मालकाच्या इशाऱ्यावरून पर्यटकांना मरेपर्यंत मारहाण करतात. ही एका अर्थाने गुंडगिरीच किनारी भागांमध्ये सुरू आहे. या गोष्टींकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. किनारी भागातील कायदा सुव्यवस्थेवर पोलिसांचे कुठलेच नियंत्रण नाही, त्यामुळे पर्यटकच नव्हे तर तिथल्या व्यावसायिकांमुळे स्थानिकही सुरक्षित नाहीत. पर्यटन क्षेत्राची बदनामी थांबवायची असेल, तर पोलीस यंत्रणा मजबूत असायला हवी आणि पर्यटन क्षेत्रात सुरू असलेल्या गुंडगिरीला आळा बसायला हवा. चुकीच्या लोकांच्या हातात किनारे गेले आहेत. तिथे बेकायदा पद्धतीने थाटलेले धंदे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी करण्यास मुख्य कारण ठरत आहेत. पर्यटकांना लुबाडण्याचे आणि मारहाण करण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर एक दिवस पर्यटक गोव्याकडे कायमची पाठ फिरवतील, ज्याचा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेला बसेल. कोविडची झळ गोव्यातील पर्यटन क्षेत्राने सोसली आहे. सुदैवाने कोविडनंतर देशी-विदेशी पर्यटक पुन्हा गोव्याला पसंती दर्शवत आहेत. दरवर्षी वाढत असलेले आकडे पाहता गोव्याला पसंती देणाऱ्या पर्यटकांमध्ये पुन्हा वाढ दिसत आहे. मात्र, गोव्याला विदेशीच पर्यटक हवे, देशी पर्यटक नको, असे म्हणत देशी पर्यटकांना मारहाण करण्याचे, त्यांना त्यांच्या प्रांतावरून हीन वागणूक देण्याचे प्रकार थांबायला हवेत. कळंगुट किनाऱ्यावर प्लॅनेट गोवा बीच शॅकमध्ये घडलेला पर्यटकांना मारहाण करण्याचा प्रकार हा निंदनीय आहे. फक्त तिथेच नव्हे तर उत्तर गोव्यात पर्यटकांना छेडण्याचे, त्यांना मारहाण करण्याचे प्रकार रोज घडत आहेत. हे प्रकार थांबले नाहीत तर गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची अधोगती ठरलेली आहे. वेळीच सरकारने यात लक्ष घालून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांना ठोस निर्देश द्यायला हवेत.