भोंदूबाबा कोट्यवधी रुपयाची इस्टेट जमा करतात. राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे कृत्य होऊ शकत नाही. हे जरी सत्य असले तरी त्यामागची कारणे शोधली पाहिजेत. अशा प्रकरणाला पायबंद घातला नाही तर पुढच्या काळात वाईट स्थिती निर्माण होईल.

महाराष्ट्रात भोंदू बाबांना यापूर्वी व आता सरकारी मान्यता मिळाल्याने अशोक खरात सारखी प्रकरण बाहेर येत आहेत. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांचे फोटो या अशोक खरातबरोबर असल्याने त्याला राजकीय वळण मिळाले आहे.
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. विशेष म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्रात अमलात आणला आहे. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे अनिंसने म्हटले आहे. मुख्यतः एका पीडित महिलेने हा खटला दाखल केल्याने खरातचे प्रकरण बाहेर आले. त्याने या भोंदूगिरीतून कोट्यवधी रुपयाची मालमत्ता जमा केली, असे सोशल मीडियावरील वृत्तात नमूद केले आहे. कोणी अशोक खरातची मालमत्ता ५०० कोटींची तर कुणी एकूण पाच हजार कोटीची असल्याचे म्हटले आहे. किती कोटींची इस्टेट हा प्रश्न इथे गौण आहे. मुख्यतः राजकीय नेत्यांचा संबंध आल्याने हे प्रकरण चिघळेल आहे.
महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे प्रकरणाची तीव्रता वाढली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अत्यंत कडक भूमिका घेतल्याने रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. चाकणकर यांनी जे स्पष्टीकरण दिले आहे तेही महत्वाचे आहे. अशोक खरात व त्यांची पत्नी हे त्यांचे गुरू आहेत आणि गुरुची पाद्यपूजा करणे हे परंपरेने चालत आले आहे. मात्र अनेक राजकीय नेत्यांचे खरातसोबतचे फोटो जाहीर झाल्यामुळे विविध राजकीय पक्षांनी प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. उबाठा शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राजकीय नेत्यांच्या खरात सोबतच्या फोटो सेशनवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. परंतु त्यांना माहित नाही की, त्यांच्याच पक्षाच्या एका आमदाराचा फोटो खरातबरोबर आहे. एवढेच कशाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील व भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांचे फोटो खरातबरोबर असल्याचे प्रसिद्ध झाले.
कुठलाही नेता मोठा होतो तेव्हा लोक व नागरिक त्याच्यासमवेत जाऊन फोटो काढतात. याचा अर्थ त्यांचा घनिष्ठ संबंध आहे हे म्हणणे योग्य नाही. ज्या पीडित महिलेने तक्रार दाखल केली आहे त्यामागे काही बनाव आहे का? याचा तपास देखील एसआयटी करीत आहे. अनेक राजकीय नेते या खरातशी खरोखर संबंधित आहेत की नाही त्याची छाननी होणे आवश्यक आहे. एखाद्या नेत्याचा केवळ फोटो या भोंदू बाबांबरोबर आला म्हणून त्यांचा संबंध त्यांच्याशी जोडणे योग्य नाही.
अशोक खरात ही व्यक्ती भोंदू बाबाचे काम करत होती तर महाराष्ट्र सरकारच्या पोलीस खात्याला याची माहिती असणे आवश्यक होते. परंतु जेव्हा राजकीय संबंध येतात तेव्हा पोलीस खाते निष्प्रभ ठरते. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्या संदर्भात होणारे आरोप-प्रत्यारोप पाहता यात नक्कीच काही 'राजकीय चाचेगिरी' असणे असंभव नाही. रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष केल्यानंतर अनेक राजकीय पक्षाच्या महिला नेत्यामध्ये असूया निर्माण झाली होती. त्यातूनच हा सगळा बनाव केला गेला का, याची शहनिशा एसआयटी करत आहे.
महाराष्ट्रात एकेकाळी धुळ्याचे धर्मभास्कर प्रकरण असेच रंगले होते. भाजपचे माजी आमदार अनिल गोटे हे एका वृत्तपत्राचे वार्ताहर असताना त्यांनी हे प्रकरण बाहेर काढले होते. पुढे काय झाले? धर्मभास्करचा मृत्यही झाला. परंतु या प्रकरणातून काही निष्पन्न झाले नाही. वातावरण मात्र दूषित झाले.
महाराष्ट्रात भोंदू बाबांच्या अशा अनेक घटना घडत आहेत. अशोक खरात हे प्रकरण काही नवे नाही. यामधून अनेक गुंतागुंत बाहेर येणार आहे. म्हणूनच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी लावली आहे. प्राथमिकदृष्ट्या रुपाली चाकणकर या गुन्ह्यामध्ये दोषी दिसत असल्याकारणाने त्यांना राजीनामा देण्यास मुख्यमंत्र्यांनी फर्मावले. तसे पाहिल्यास महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा हा तिसरा बळी आहे. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे या मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता रुपाली चाकणकर यांचा नंबर लागला. या प्रकरणात ज्यांची ज्यांची नावे पुढे येत आहेत त्यांच्यामध्ये साहजिकच अस्वस्थता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे असे एक मंत्री आहेत की, ज्यांना लिखापढी चालत नाही. ते समोरच्याचे काम निव्वळ फोनवर करतात. त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली आहे, हे नाकारता येणार नाही. मग त्यांना अशा प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न उबाठा शिवसेनेने केल्यास आश्चर्य वाटणार नाही. अशोक खरात याच्या वादग्रस्त व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे.
हे भोंदूबाबा कोट्यवधी रुपयाची इस्टेट जमा करतात. राजकीय पाठबळ असल्याशिवाय हे कृत्य होऊ शकत नाही. हे जरी सत्य असले तरी त्यामागची कारणे शोधली पाहिजेत. अशा प्रकरणाला पायबंद घातला नाही तर पुढच्या काळात वाईट स्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. खरातचे जे प्रकरण उघड झाले आहे ते अत्यंत निदनीय आहे. ते किती सत्य व असत्य आहे याची शहनिशा एसआयटी करत आहे. मात्र एक निश्चित की राजकीय पाठबळ असल्याशिवाय कोट्यवधी रुपयाची इस्टेट एक व्यक्ती निर्माण करू शकत नाही. हा प्रश्न खरात-चाकणकर त्यांच्यापुरता मर्यादित नाही.
अनेक महिलांसोबत जर खरातने गैरप्रकार केले असतील तर ते अत्यंत निंदनीय आहे. समाज व्यवस्था ही आज संपूर्णपणे बिघडली आहे. त्याचाच परिपाक म्हणून अशोक खरातसारखे भोंदूबाबा निर्माण होतात. या भोंदूबाबाकडे येणाऱ्या महिलांना तुझ्या नवऱ्याला मारून टाकण्याच्या धमक्या हा खरात द्यायचा. अनेक भयानक गोष्टी यातून उघड होऊ शकतात. म्हणूनच एसआयटी चौकशी महत्वाची मानली जाते.

- अरविंद भानुशाली