
आगामी २०२६ फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद उत्तर अमेरिका भूखंडाकडे असतानाच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या फुटबॉल संघाबाबत केलेल्या एका विधानामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. इराणचा राष्ट्रीय फुटबॉल संघ जर विश्वचषकासाठी अमेरिकेत आला, तर त्यांच्या 'जीविताला आणि सुरक्षिततेला' धोका निर्माण होऊ शकतो, असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांच्या 'ट्रुथ सोशल' या समाजमाध्यमावरील पोस्टचा स्क्रीनशॉट जगभरात व्हायरल झाला असून, यामुळे खेळाच्या मैदानात राजकारणाने प्रवेश केल्याची चर्चा रंगू लागली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे विश्वचषकात स्वागत आहे, परंतु त्यांच्या स्वतःच्या जीविताच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी येथे येणे मला योग्य वाटत नाही. अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे देश संयुक्तपणे या स्पर्धेचे यजमानपद भूषवत असताना, यजमान देशाच्या प्रमुखाकडूनच अशा प्रकारचे विधान येणे हे इराणच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. इराणने यापूर्वीच आशियाई पात्रता फेरी पार करून या स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले असून, त्यांचे साखळी सामने लॉस एंजेलिस आणि सिएटलसारख्या अमेरिकन शहरांमध्ये नियोजित आहेत.
या वादामागे अमेरिका आणि इराणमधील बिघडलेले राजनैतिक संबंध कारणीभूत असल्याचे मानले जाते. गेल्या काही महिन्यांत इस्रायलच्या पाठिंब्याने अमेरिकेने इराणवर केलेल्या लष्करी कारवायांमुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. अशा परिस्थितीत इराणचा संघ अमेरिकन भूमीवर खेळायला येईल का, हा मोठा प्रश्न आहे. इराणमधील काही वरिष्ठ नेत्यांनीही सध्याच्या राजकीय वातावरणात अमेरिकेत होणाऱ्या विश्वचषकात सहभागी होणे कठीण असल्याचे संकेत दिले आहेत. खेळाडूंच्या सुरक्षेची हमी आणि राजकीय संघर्ष यामुळे इराण या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
क्रीडा क्षेत्रातील जाणकारांच्या मते, विश्वचषक ही जागतिक स्तरावरील शांतता आणि समन्वयाची स्पर्धा मानली जाते. मात्र, ट्रम्प यांच्या विधानामुळे खेळाडूंच्या मानसिकतेवर आणि स्पर्धेच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. फिफा या जागतिक फुटबॉल नियामक मंडळाने अद्याप या प्रकरणावर कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. सध्याच्या वेळापत्रकानुसार इराणचा संघ स्पर्धेत कायम आहे, मात्र भूराजकीय संघर्षाचे हे ढग स्पर्धेच्या सुरुवातीपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहेत. ते न झाल्यास इराणवरदेखील रशियासारखी नामुष्की ओढवली जाईल.
- ऋषभ एकावडे