भोंदू ‘कॅप्टन’च्या विळख्यात दिग्गज

पुरोगामी महाराष्ट्रात मोठमोठे लोक या खरातच्या आहारी गेले होते, यापेक्षा दुर्दैव काय? हेच लोक त्याला आता बाहेर काढण्यासाठीही आटापिटा करू शकतात. त्यामुळे पीडितांना न्याय मिळणे दूरच, या प्रकरणाचा तपासही पुढे जाईल की नाही याबाबत शंका आहे.

Story: संपादकीय |
5 hours ago
भोंदू ‘कॅप्टन’च्या विळख्यात दिग्गज

भल्याभल्यांचे भविष्य सांगणाऱ्या आणि अनेकांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा दावा करणाऱ्या आणखी एका भोंदूच्या कारनाम्यांचा महाराष्ट्रात भांडाफोड झाला आहे. अनेक राजकीय नेत्यांचा भविष्यवेत्ता म्हणून त्याचा उल्लेख होतो. अनेक दिग्गज महिला, अभिनेत्री आणि राजकीय नेत्यांचा त्याच्या अनुयायांमध्ये समावेश होता. आसाराम बापू, गुरमीत राम रहीम सिंग, नारायण साई अशा अनेक भोंदूंचा यापूर्वी भांडाफोड झाला आहे. तरीही लोक फसतात आणि अशा लोकांच्या आहारी जातात. त्याचाच फायदा हे भोंदू घेतात. नाशिकमधून ज्याला अटक झाली आहे, त्या अशोक खरात उर्फ कॅप्टन याचे कारनामेही असेच आहेत. त्याच्या अटकेने महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या खळबळ उडाली आहे. कारण, अनेक राजकीय नेते त्याच्याकडे जायचे. या महाभागाचे महिलांशी अश्लील चाळे करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्याच्या कार्यालयावर छापे टाकले तेव्हा पेनड्राइव्हमध्ये अनेक व्हिडिओ सापडले. हे प्रकरण साधे नाही. या माणसाने राजकारण्यांच्या आशीर्वादाने आपला दबदबा निर्माण करून महिलांचे आयुष्य बरबाद केले. त्याला राजकीय आशीर्वाद असल्यामुळे आणि त्याच्या कार्यालयातून अनेक बड्या लोकांचे व्हिडिओ सापडल्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाताना पोलिसांना अडथळेही येतील. पुरोगामी महाराष्ट्रात हा आणखी एक महाभाग पोलिसांच्या हाती लागला आहे, तो एका महिलेने केलेल्या तक्रारीमुळे.

अंकशास्त्रात माहीर असल्याचे सांगून हा लोकांना फसवायचा. पूर्वी कधीतरी जहाजांवर कॅप्टन म्हणून काम करून आल्यामुळे त्याला कॅप्टन म्हणत. भविष्य सांगण्याच्या बहाण्याने हा महिलांना आणि इतर राजकीय नेत्यांना काही खडे देत होता. अंकशास्त्राचा अभ्यास असल्याचे भासवून काही गोष्टी सांगायचा. विधी करायच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार करायचा. कार्यालयाबाहेर लोक वाट पाहत बसलेले असतानाही त्याने आत अनेक महिलांवर अत्याचार केले होते, असे आतापर्यंतच्या तपासात दिसून आले आहे. हा तपास गांभीर्याने घेतला तर या भोंदूला तुरुंगातच राहावे लागेल. त्यासाठी निष्पक्ष आणि सखोल तपास होणे गरजेचा आहे. ज्या महिलेवर याने अत्याचार केले, तिने आपल्या नातेवाईकाला याविषयी सांगितले. त्यानंतर महिलेला विश्वासात घेऊन नातेवाईकांनी पुढाकार घेऊन पोलिसांत तक्रार केली. यापूर्वीही खरातच्या विरोधात तक्रारी होत्या, पण त्याकडे पोलिसांनीही गांभीर्याने पाहिले नव्हते. आता मात्र त्याची सुटका होईल असे दिसत नाही. त्याच्या कार्यालयात सापडलेल्या पेनड्राइव्हमधून लैंगिक अत्याचाराचे अनेक प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. हा भोंदू महिलांना व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करत असण्याची शक्यता आहे. त्याच्या आशीर्वादाने अनेकांनी राजकीय पदे मिळवली, सरकारी पदे मिळवली. त्यामुळे या खरातचे कारनामे सखोल चौकशीनंतरच उघड होतील. अशा नराधमांचे गुन्हे उघड व्हायला हवेत.

हा खरात फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर इतर राज्यांतही प्रसिद्ध होता. राजकीय नेते, उद्योजक, महिला, सरकारी अधिकारी मोठ्या प्रमाणात ये-जा करत. अशा भोंदूंनी दिलेले दोरे-गंडे हातभर बांधून फिरणारे नेते देशात काही कमी नाहीत. तंत्रमंत्राच्या सहाय्याने राजकारणात यशस्वी होता येते, पदे मिळतात असा काहींचा भ्रम असल्यामुळे अशा भोंदूंचे आयते फावते. आपल्याकडे दैवी शक्ती आहे असे सांगून हा भोंदू तर महिलांना फसवत होताच, पण राजकीय नेत्यांनाही आशीर्वाद द्यायचा. पुरोगामी महाराष्ट्रात मोठमोठे लोक या खरातच्या आहारी गेले होते, यापेक्षा दुर्दैव काय? हेच लोक त्याला आता बाहेर काढण्यासाठीही आटापिटा करू शकतात. त्यामुळे पीडितांना न्याय मिळणे दूरच, या प्रकरणाचा तपासही पुढे जाईल की नाही याबाबत शंका आहे. त्याच्याकडे ज्या गोष्टी सापडल्या, त्याच्या आधारे त्याने अशा किती महिलांना फसवले त्याची माहिती समोर यायला हवी. या प्रकरणात आणखी पीडित महिला असतील तर त्यांनीही धाडस दाखवून या नराधमाचा खरा चेहरा जगासमोर आणायला हवा. त्याच्यासारखे अनेक भोंदू गावोगावी दुकाने थाटून तंत्रमंत्राच्या आधारे लोकांना फसवत असतात. लोकांना सावध करण्यासाठी महिलांनी आणि इतर लोकांनीही अशा लोकांच्या आमिषांना, दैवी शक्ती असल्याच्या बतावण्यांना बळी पडू नये यासाठी पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.