फोंड्यातील निकाल भाजपच्या विरोधात लागला तर भाजपसाठी हा मोठा धक्का ठरेल. काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर विरोधकांचे मनोबल वाढेल. अशा अनेक अंगाने फोंड्याच्या निवडणुकीचे महत्त्व वाढत आहे. याच निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी खरोखरच सर्व विरोधक एकत्र येतात का, त्याकडेही गोवेकरांचे लक्ष आहे. अर्थात भाजपसाठीच नव्हे तर विरोधकांसाठीही ही परीक्षा आहे.

विधानसभेच्या फोंडा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक ९ एप्रिलला होणार आहे. रविवारी निवडणूक आयोगाने तशी घोषणा केली. आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ या राज्यांसह पुदुच्चेरीतील विधानसभा निवडणुकांसह काही राज्यांतील पोटनिवडणुका एप्रिलमध्ये होत आहेत. त्यात गोव्यातील फोंडा मतदारसंघाचा समावेश आहे. रवी नाईक यांच्या निधनानंतर १५ ऑक्टोबरपासून ही जागा रिक्त होती. ही निवडणूक होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका होती. निवडणूक आयोगाने नियमाप्रमाणे सहा महिन्यांत निवडणूक घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले. एप्रिलमध्ये मतदान आणि ४ मे रोजी या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सलग २०१२ पासून सत्तेत असलेल्या भाजपला शह देण्यासाठी आणि रवी नाईक यांच्यामुळे भाजपकडे असलेली फोंड्यातील जागा मिळवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. नेहमी उमेदवारी जाहीर करण्यासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत थांबणाऱ्या काँग्रेसने, यावेळी निवडणूक जाहीर होऊन दोन दिवस उलटण्यापूर्वीच आपला उमेदवार घोषित करून राजकीय तत्परता दाखवली आहे. यावेळी काँग्रेसने पक्षांतर्गत बंडाळी रोखून एकच नाव दिल्लीला पाठवले होते. काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनी मागच्या वेळी चांगली मते मिळवली होती, पण त्याही वेळी भाटीकर काँग्रेसपेक्षा पुढे होते. २०२२ मध्ये भाटीकर मगोच्या उमेदवारीवर निवडणूक लढले होते. अवघ्या ७७ मतांच्या फरकाने रवी नाईक निवडून आले होते. रवी यांच्या निधनानंतर फोंड्यातील समीकरणे बदलली आहेत. डॉ. भाटीकर मगोतून काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसने भाटीकर यांच्याच नावाची शिफारस उमेदवारीसाठी केली होती. काँग्रेसच्या वरिष्ठांनी भाटीकर यांना उमेदवारी देऊन भाजपच्या आधी उमेदवार घोषित करण्याचा नवा पायंडा घातला. काँग्रेसमधील हे बदल फोंड्यातील निवडणुकीमुळे दिसले आहेत. २०२७ पर्यंत काँग्रेसने अशा प्रकारे पक्षांतर्गत निर्णय घेण्यात तत्परता दाखवली आणि बंडाळी रोखण्यासाठी उपाय केले, तर गोव्यात काँग्रेसला गतवैभव मिळू शकते.
फोंडा मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असेल, याचे कोडे अद्याप सुटलेले नाही. रवी नाईक यांचे सुपुत्र रितेश नाईक यांनी दावेदारी केली आहे. भाजपचे विश्वनाथ दळवी हेही इच्छुक आहेत. काँग्रेसने उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपही एक-दोन दिवसांत आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर करेल. कारण प्रचाराला सुरुवात करायची असेल तर उमेदवार हवा. काँग्रेस उमेदवार जाहीर करून आता प्रचाराला लागणार आहे. भाजपने कोणीही उमेदवार दिला तरी काँग्रेसच्या उमेदवारासोबत यावेळी थेट लढत होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस, मगो अशी तिरंगी लढत होती. रवी नाईक अल्प मताधिक्याने निवडून आले होते. रवी नाईक यांच्यासारख्या मुरलेल्या राजकीय नेत्याला भाटीकर यांनी तोडीची टक्कर दिली होती. त्यावेळी काँग्रेसचा उमेदवार शर्यतीत असल्यामुळे रवी नाईक जिंकले, असे मानले गेले. यावेळी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत अपेक्षित आहे आणि काँग्रेसने भाटीकर यांना आपला उमेदवार केला आहे. त्यामुळे जी निवडणूक रवी नाईक यांना जड गेली होती, ती त्यांच्या अनुपस्थितीत भाजपला सोपी जाईल का, हे पहावे लागेल.
सरकारने विधानसभा अधिवेशन गुंडाळले त्याचाही अर्थ फोंडा पोटनिवडणुकीच्या तयारीसाठी सरकारने तसे केले, असाच लावला जातो. अर्थात अधिवेशन नसल्यामुळे भाजपचे नेते फोंडा मतदारसंघात वेळ देतील. भाजपसोबत मगोचे नेतेही फोंड्यात भाजपच्या मदतीला जातील का, त्याकडेही मतदारांचे लक्ष आहे. कारण सरकारमध्ये भाजप-मगो युती आहे. मगोने खरोखरच मनापासून भाजपला पाठिंबा दिला आणि भाजप उमेदवारासाठी काम केले तर फोंड्यातील रंगत वाढेल. त्यासाठी मगोच्या नेत्यांनी उघडपणे भूमिका घ्यावी लागेल. मगोने भाजपला मदत केली नाही, तर भाजप या निवडणुकीत एकाकी पडेल. निकाल कोणाच्याही बाजूने लागू शकतो. विधानसभा निवडणूक पुढच्या वर्षी होत असताना त्यापूर्वी फोंड्यात पोटनिवडणूक होत आहे, हे भाजपसाठी सत्त्वपरीक्षेपेक्षा कमी नाही. फोंड्यातील निकाल भाजपच्या विरोधात लागला तर भाजपसाठी हा मोठा धक्का ठरेल. काँग्रेसच्या बाजूने निकाल लागला तर विरोधकांचे मनोबल वाढेल. अशा अनेक अंगाने फोंड्याच्या निवडणुकीचे महत्त्व वाढत आहे. याच निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी खरोखरच सर्व विरोधक एकत्र येतात का, त्याकडेही गोवेकरांचे लक्ष आहे. अर्थात भाजपसाठीच नव्हे तर विरोधकांसाठीही ही परीक्षा आहे.