
कळंगुट हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असले, तरीही या गावाची ओळख आता ‘सेक्स डेस्टिनेशन’ म्हणून होऊ लागली आहे. सोनेरी वाळूच्या दुनियेतील या समुद्रकिनारी राजरोसपणे देहविक्रीसारखा अनैतिक व्यवहार काही दलाल राजरोसपणे चालवत आहेत. यामुळे स्थानिक महिलांचे चारित्र्य आणि त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
कळंगुट गावावर ओढवलेली ही समस्या आजकालची नसून गेल्या दोन-तीन दशकांपासूनची आहे. या समस्येचे निवारण करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, सरकार आणि प्रशासन अयशस्वी ठरले आहे; किंबहुना त्यांना यात रस राहिलेला नाही, असेच दिसते. अलीकडेच, खोब्रावाडा - बागा येथील रहिवाशांनी या वाढत्या उपद्रवाविरोधात आवाज उठवत लोकप्रतिनिधी आणि पोलिसांना संयुक्त बैठक घेण्यास भाग पाडले. या बैठकीत ‘नेबरहुड वॉच समिती’ स्थापन करण्यात आली, परंतु तरीही हा उपद्रव थांबलेला नाही.
बायणा वस्ती हटवल्यानंतर देहविक्रीचा हा अनैतिक व्यवहार गोव्यातील सर्व शहरे आणि किनारीपट्टीत पसरला आहे. सध्या गोव्यातील पर्यटनाला केवळ ‘बीच टुरिझम’चे स्वरूप आले आहे. त्यात सोशल मीडियामुळे गोवा ही ‘भोगभूमी’ असल्याचा आभास निर्माण झाला आहे. यामुळे येथे येणार्या देशी पर्यटकांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या महिलेला ‘रेट’ विचारण्यात संकोच वाटत नाही; यावरून देशी पर्यटकांच्या मनातील कळंगुटची प्रतिमा अधोरेखित होते.
काही वर्षांपूर्वी कळंगुटमध्ये विविध आस्थापनांच्या नावाखाली चालणार्या या अनैतिक व्यवसायाविरुद्ध स्थानिकांनी आंदोलन पुकारले होते. मात्र, त्यात काही लोकप्रतिनिधींनी सहभाग घेत स्वतःचा स्वार्थ साधला. आंदोलन संपल्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती निर्माण झाली.
कळंगुटमधील बहुतेक कुटुंबे ही पर्यटन व्यवसायावरच अवलंबून आहेत. एखाद्या कुटुंबावर प्रत्यक्ष प्रसंग ओढवल्यावरच स्थानिक लोक आवाज उठवतात, मात्र परिस्थिती निवळली की हा विषय विसरला जातो. याचाच फायदा या अनैतिक व्यवसायातील दलाल घेतात आणि प्रशासनाच्या मेहरबानीने हा व्यवसाय पुन्हा तेजीत सुरू होतो. ही परिस्थिती केवळ कळंगुटचीच नव्हे, तर राज्यातील संपूर्ण किनारपट्टीची आहे. नुकताच हरमलमध्येही असाच लोकांनी आवाज उठवत पोलीस स्थानकावर मोर्चा काढल्याने पोलिसांना कारवाई करणे भाग पडले. आर्थिक लाभाच्या आमिषापोटी काही सरकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रोत्साहन दिल्यामुळेच हे अनैतिक व्यवसाय फोफावले आहेत, अशी चर्चा आहे.
- उमेश झर्मेकर