उमेदवार निवडीसाठी काँग्रेसचा वेगळा प्रयोग

Story: राज्यरंग |
12th March, 10:20 pm
उमेदवार निवडीसाठी काँग्रेसचा वेगळा प्रयोग

विधानसभा निवडणूक एप्रिलच्या मध्यात होण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांत राज्यात नवे सरकार सत्तारूढ होईल. यावेळीही भाजपविरुद्ध काँग्रेस असाच सामना रंगण्याची चिन्हे आहेत. सलग दहा वर्षे भाजप सत्तेत आहे. काँग्रेसने यंदा पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांच्या कल्पनेनुसार उमेदवार निवडण्यासाठी वेगळी रणनीती आखली आहे.

यंदाची निवडणूक मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा विरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई यांच्यातील प्रतिष्ठेचा सामना ठरली आहे. सरमा काँग्रेसला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसमधील नाराज नेत्यांना जवळ करत आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेनकुमार बोरा आता भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेससाठी ईशान्येकडील हे राज्य ताब्यात आल्यास भाजपला इतर राज्यांत धक्का देणे सोपे होणार आहे.

काँग्रेसने उमेदवार निवडीसाठी छाननी समितीचे प्रमुखपद सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे सोपवले आहे. समितीत त्यांच्यासोबत खासदार सप्तगिरी संकर उल्का, खासदार इम्रान मसूद आणि श्रीवेल्ला प्रसाद हे सदस्य आहेत. प्रियंका यांच्या सूचनेनुसार समितीच्या सदस्यांवर प्रत्येकी पाच जिल्ह्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे सदस्य संबंधित भागांचा दौरा करून नागरी समुदाय, पक्ष कार्यकर्ते, स्थानिक पत्रकार व अन्य संबंधितांशी चर्चा करतील. त्यातील माहिती छाननी समितीपुढे ठेवली जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात अन्य राज्यांतही अशाच प्रकारे उमेदवारांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

अप्पर आसाममध्ये सध्या छाननी प्रक्रिया वेगाने सुरू आहे. दिब्रुगड, धेमजी, तिनसुखिया या मुस्लीमबहुल जिल्ह्यांची जबाबदारी मसूद यांच्यावर आहे. माजोली, जोरहट, कबरी, अनलॉँग, नागाव या आदिवासींची संख्या अधिक असलेल्या भागात आदिवासी नेत्या उल्का संवाद साधणार आहेत. एकूण १२६ पैकी २८ ते ३० जागा पूर्वी मुस्लीमबहुल मानल्या जात. मतदारसंघ फेररचनेत हे प्रमाण २० ते २२ वर आले. मुस्लीमबहुल मतदारसंघांत काँग्रेसचा सामना ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटशी आहे. राज्यात ६१ टक्के हिंदू तर ३४ टक्के मुस्लीम आहेत. गेल्या वेळी काँग्रेसने आघाडीतून ९५ जागा लढविल्या, पैकी २९ जिंकल्या होत्या. भाजपने लढविलेल्या ९३ पैकी ६० जागांवर विजय मिळवला होता.

एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले हिमंता बिस्वा सरमा आता ईशान्येकडील भाजपचे प्रमुख नेते मानले जातात. कट्टर हिंदुत्ववादी अशी सरमा यांची प्रतिमा आहे. आसामी संस्कृती, शेजारी देशातून होणारी घुसखोरी, लोकसंख्येतील बदल हे मुद्दे सरमा सातत्याने मांडत आहेत. जनमत चाचण्यांमध्ये सरमा यांची लोकप्रियता कायम असली, तरी गौरव गोगोई काँग्रेसकडून जोरदार लढत देत असल्याचे स्पष्ट होत आहे. या दोन नेत्यांच्या लोकप्रियतेचा कस विधानसभा निवडणुकीत लागणार आहे.

- प्रदीप जोशी