ब्रह्मा करमळी गावात पोर्तुगीज पूर्वकाळात तिसवाडीतील करमळी गावातून झालेले ब्रह्मदेवाचे आगमन इथल्या लोकमानसाला आनंदित करणारे होते आणि त्यामुळे इथल्या शिगम्यात पूर्वीच्या काळी हमखास बह्मदेवाची लावणी उत्साहाने सादर केली जायची.

महाराष्ट्रातील पारंपरिक लावणी स्त्रियांच्या मदहोश लावण्याचे वर्णन नृत्यांगना नृत्याने पेश करून रसिकांना घायाळ करतात. परंतु या उलट गोव्यातील शिगम्यात लोकसमूहातर्फे सादर केली जाणारी लावणी आपल्या आराध्य दैवतांचे लावण्य वर्णन करून भक्तीभावाचा प्रचार करतात.
पर्ये गावातील भूमिका ही सत्तरीत एकेकाळी असलेल्या १३० गावांची (साठा-सत्तरीची) अधिष्ठात्री देवी असून, तुळशीमळा येथील भाविकांनी आज पर्येत भूमकेच्या मंदिरात तबला आणि कासाळे यांच्या वादनातून आपल्या आराध्य दैवतांचे वर्णन करणाऱ्या लावणी गीतांचे सादरीकरण करून, मानवंदना अर्पण केली.
कारापूरातील विठ्ठलापूर येथे गोंदजी नाईक शिरोडकर या शाहिराचे वास्तव्य १०० वर्षांपूर्वी होते. त्यांनी रामायण, महाभारत या महाकाव्यांतून प्रेरणा घेऊन शब्दमाधुर्य, गेयता आणि प्रासादिकता यांनी एकापेक्षा एक सुरस लावण्यांची निर्मिती केली होती. या लावण्या आजतागायत पर्ये, कारापूर गावातील लोकगायकांनी सादर करण्याची परंपरा अखंडित ठेवल्याने, आजच्या बदलत्या काळात येथील लोकांना श्रवणसुखाचा आनंद देत असतात. पूर्वी पखवाज आणि कासाळे यांच्या संगीत साथीत सादर होणाऱ्या या लावण्या आज तबला-कासाळेवर तितक्याच पारंपरिक शैलीत सादर होताना, लोकमानसाला रिझवण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत.
श्री पांडुरंग पंढरीहुनी तो आला साखळी नगरी॥
ये राण्याचे भक्तिकरिता श्रीहरी॥
वसे शृंखलापुरी समापद उभा विठोबा विटेवरी॥
अशी श्री विठ्ठलाचे लावण्य आणि राणे सरदेसाईंच्या शौर्याची महती व्यक्त करणारी लावणी असो अथवा दानशूर, प्रजाहितदक्ष राजा हरिश्चंद्रांची त्यागाची कथा सांगणारी लावणी यांचे उत्स्फूर्तपणे सादरीकरण लोककलाकारांनी परंपरेने निश्चित केलेल्या ठिकाणी केले. त्यांच्या लावण्यांत शूरवीर राणे मंडळीने इथल्या धवड जमातीचे शिरकाण करून, सत्तरी भयमुक्त केली त्याचीही कथा पेश केली. लावणी, जती यांच्यानंतर तळी यांचे गायन केल्यावर, घरोघरच्या सुखसमृद्धीसाठी त्यांनी गाऱ्हाणे घातले. त्यावेळी त्यांना नारळ, तांदुळ आणि पैसे यांनी युक्त तळी प्रदान करून त्यांचा मानसन्मान करण्यात आला. सत्तरीतील काही गावांत आजही लोकगायक नमन, जती, सकारती, झाडो, लावणी, तळी यांचे गायन पारंपरिक लोकसंगीतावर करत असतात. तुळशीमळा येथील लोककलाकारांनी आपल्या पूर्वजांकडून लावणी गीतांचा हा वारसा आत्मसात करून, लोकपरंपरेला जीवंत ठेवलेले आहे.
ढोलकीच्या तालावर नाचत जेव्हा नऊवारी साडी परिधान केलेली सौंदर्यवती नृत्यांगना लावणी सादर करते, तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील प्रेक्षक देहभान विसरून नृत्याशी एकरूप होतात. अशा लावणीच्या माध्यमातून नृत्य, नाट्य आणि गायन यांच्याशी एकरूप झालेल्या रसिकांना गोव्यातील भक्तिरसपूर्ण लावणीविषयी अल्प प्रमाणात माहिती आहे.
गोव्यातील शिगमा हा खरेतर इथल्या शेताभाटांत कष्टाची कामे करणाऱ्या जाती-जमातींचा लाडका आणि हवाहवासा वाटणारा लोकोत्सव असून, त्यात तालगडी, तोणयामेळ, मोरुलो ,चेंडुफळी आदी पुरुषी लोकनृत्यांविषयी आकर्षण आहे. एकेकाळी मोठ्या आत्मियतेने सादर केली जाणारी लावणी मात्र खूपच कमी ठिकाणी पेश केली जाते. सत्तरीत बऱ्याच गावात लावणीची परंपरा रूढ होती. ब्रह्मा करमळी गावात पोर्तुगीज पूर्वकाळात तिसवाडीतील करमळी गावातून झालेले ब्रह्मदेवाचे आगमन इथल्या लोकमानसाला आनंदित करणारे होते आणि त्यामुळे इथल्या शिगम्यात पूर्वीच्या काळी हमखास बह्मदेवाची लावणी उत्साहाने सादर केली जायची.
ब्रह्मदेव काय देव?
काय देव त्याचे नाव थोर...
अशा शब्दांत घुमट, कासाळे यांच्या वादनात सुरू होणारी लावणी लोकमानसांचे आकर्षण असायची. आज ब्रह्मा करमळीतील शिगम्यातून पारंपरिक नृत्य, गायन आणि वादन यांची परंपरा लोप पावण्याच्या वाटेवर आहे. परंतु असे असताना सत्तरीतील पर्ये गावातील तुळशीमळा, कारापूरच्या विठ्ठलापूर येथील भाविकांनी मात्र लावणीच्या सादरीकरणाची परंपरा आजच्या काळात जतन करून ठेवली आहे.
सत्तरी तालुक्यात देवदेवतांविषयीचा भक्तीभाव, आदर प्रकट करण्यासाठी लावणी या लोकगीत गायन प्रकाराचा विनियोग इथल्या लोकमानसाने कधी काळी केला होता. परंतु आज अशा लोकगीतांचे लोकसंगीताच्या पार्श्वभूमीवर सादरीकरण दुरापास्त होत चाललेले असताना सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील काही मोजकेच कलाकार ते पर्ये येथील अधिष्ठात्री देवी भूमका आणि कारापूरातील विठ्ठलापूरला गोव्यातील पंढरपूरचा लौकिक मिळवून दिल्याची भावना
असल्याकारणाने लावणी गायनाची परंपरा टिकवून ठेवलेली पहायला मिळत आहे. गोंदजी नाईक शिरोडकर हा शाहिर विठ्ठलापूरला स्थायिक असल्याने राणे सरदेसाई यांच्या पोर्तुगीजांविरुद्ध ज्या लढाया लढल्या गेल्या होत्या, त्यांच्या शौर्यगाथा त्यांच्या कानी पडल्या असाव्यात आणि त्यासाठी त्यांनी त्यांचे गुणगान करणाऱ्या एकापेक्षा एक सुरस आणि अर्थपूर्ण लावण्यांची निर्मिती केली होती. या लावण्या शिगमोत्सव सादर करण्याची लोकपरंपरा जुन्या काळी निर्माण झाल्याने, आज लोकविधी म्हणून का होईना, त्यांचे सादरीकरण करणे या लोकसंकेताचे आत्मियतेने पालन होत आहे. तुळशीमळा येथे स्थायिक झालेल्या लोकसमूहासाठी विठ्ठलापूरचा श्री विठ्ठल आणि पर्येची भूमका यांच्याविषयीच्या लावण्या सादर करणे आवश्यक मानले आणि त्याचे पालन केले जात आहे, ही आनंदाची बाब आहे.
पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या लोकपरंपरांतून त्या त्या समाजाच्या पूर्वापार सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनातल्या पैलूंचे दर्शन घडत असते. गोंदजी नाईक शिरोडकर यांच्या रचना तुळशीमळा-पर्ये, विठ्ठलापूर-कारापूर येथील कष्टकरी समाजाच्या ओठावर सहजपणे रुळल्या, त्याला ही गीते अगदी सहज आणि सुंदर शब्दांचे नियोजन करून त्यांनी लिहिल्या होत्या आणि त्यांचे दरवर्षी आपल्या पारंपरिक मांडावर सादरीकरण करणे ही शिगम्यातली अविभाज्य लोकपरंपरा बनवली होती. त्यासाठी या लावण्यांचे सादरीकरण म्हणजे इथल्या कष्टकऱ्यांना आनंदाची पर्वणी ठरली होती. गोव्यातील प्रचलित लोकनृत्यांसाठी आजतागायत गायन करण्यासाठी जी लोकगीते उपयोगात आणली गेली, त्यांचा कर्ता पूर्णतः अज्ञातच राहिला होता. परंतु गोंदजी नाईक शिरोडकर यांनी जी लावणी गीते लिहिली होती, त्यांना लोकमानसाने स्वच्छेने स्वीकारले आणि लोकगीतांसारखे त्यांचे गायन, मनन करण्यात धन्यता मानली होती आणि त्यामुळे गीतकर्त्याला स्थानिक लोक विसरले असले तरी त्यांचे शब्द, ताल, लय आणि नाद यांचे गारूड मात्र इथल्या लोकमानसावर पडलेले आहे.

प्रा. राजेंद्र केरकर
(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
असून पर्यावरणप्रेमी आहेत.) मो. ९४२१२४८५४५