भारतीय क्रिकेटचा जागतिक दबदबा

एम. एस. धोनी, रोहित शर्मा, महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि आता सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने दोन वर्षांत तीनवेळा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. ही कामगिरी पाहता भारतीय क्रिकेटचे भवितव्य किती उज्वल आहे आणि जगात क्रिकेटमध्ये भारतीय संघ किती परिपक्व आणि मजबूत आहे ते सिद्ध होते.

Story: संपादकीय |
09th March, 10:53 pm
भारतीय क्रिकेटचा जागतिक दबदबा

भारताने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा विजय मिळवून विक्रम करताना जागतिक स्तरावर क्रिकेटमध्ये भारताचा दबदबाही निर्माण केला. विश्वचषकाचा अंतिम सामना न्यूझीलंडच्या सुरुवातीच्या फलंदाजीवेळी हातून निसटतोय की काय, असे वाटत असतानाच भारतीय गोलंदाजांनी पूर्ण चित्रच बदलले. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना विजयी धावसंख्या उभारण्यात महत्त्वाचा वाटा उचलला तो संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी आणि शेवटी आलेल्या शिवम दुबेनेही कमाल केली. या खेळाडूंनी कमालीची फलंदाजी केल्याने न्यूझीलंडच्या खेळाडूंचे मनोबल खचले. भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत २५५ धावांची विशाल धावसंख्या उभारली होती. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माने सुरुवातीलाच न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर हल्ला चढवून उत्तम भागीदारी केली. भारत विरुद्ध न्यूझीलंडचा अंतिम सामना जरी नंतर एकतर्फी झाला, तरीही केवळ भारतीय खेळाडूंच्या मेहनतीमुळेच यावर्षी टी-२० विश्वचषकावर पुन्हा भारताचे नाव कोरले गेले. यापूर्वी २००७ मध्ये भारत टी-२० विश्वचषकाचा पहिल्यांदा विजेता ठरला होता. त्यानंतर २०२४ मध्ये आणि आता सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने सलग दुसऱ्यांदा, तर एकूण तिसऱ्यांदा विश्वचषक पटकावून जागतिक क्रिकेटमध्ये आपण अव्वल असल्याचे सिद्ध केले आहे. २०२४ नंतर २०२५ च्या अखेरीस भारतीय महिला संघानेही विश्वचषक पटकावला होता, त्यामुळे दोन वर्षांत हा तिसरा विश्वचषक भारतीय खेळाडूंनी पटकावला आहे. एम. एस. धोनी, रोहित शर्मा, महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि आता भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली भारताने दोन वर्षांत तीनवेळा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. ही कामगिरी पाहता भारतीय क्रिकेटचे भवितव्य किती उज्वल आहे आणि जगात क्रिकेटमध्ये भारतीय संघ किती परिपक्व आणि मजबूत आहे ते सिद्ध होते. ५० षटकांचा विश्वचषक दोनवेळा आणि टी-२० विश्वचषक तीनवेळा मिळवणारा भारत जगातील एकमेव संघ ठरला आहे. एका विभागात काहीवेळा सलगपणे विश्वचषक जिंकण्याचे काम इतर काही संघांनी केले असले तरी दोन्ही विभागांत अशी कामगिरी अन्य संघांकडून झालेली नाही.

यावेळच्या विजयाचे श्रेय कर्णधार सूर्यकुमार यादव, प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्यांच्या रणनीतीला द्यायला हवे. भारतीय संघ फक्त टी-२० च्या फॉर्मेटमध्येच चांगला खेळतो असे नव्हे, तर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांतही भारताने वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, इशान किशन, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, बुमराह, अक्षर पटेल, अर्शदीप, वरुण चक्रवर्ती अशा खेळाडूंनी विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. भारतीय संघाने शिस्तीने आणि अत्यंत चतुराईने खेळ करून आधी इंग्लंडला आणि नंतर न्यूझीलंडला नामोहरम केले. दोन्ही सामन्यांमध्ये भारताने मोठी धावसंख्या उभारल्यामुळे प्रतिस्पर्धी दोन्ही संघांना जिंकता आले नाही. अंतिम सामन्यात तर न्यूझीलंडला अवघ्या १५९ धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आले. भारतीय संघातील खेळाडूंचा अनुभव, एकमेकांतील समन्वय कामी आला. भलेही सूर्यकुमारने मागील दोन सामन्यांत म्हणावी तशी कामगिरी केली नाही, पण कर्णधार म्हणून त्याचे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे योगदान टाळता येणार नाही. भारतीय संघाची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कमालीचे होते. संघामध्ये असलेला समन्वय, तरुण खेळाडूंमध्ये असलेला उत्साह यामुळेच हा विश्वचषक जिंकता आला, असे म्हणावे लागेल.

क्रिकेटमध्ये भारतीय संघाला उज्वल भवितव्य आहे, हेच मागील काही सामने पाहून लक्षात येईल. संघ निवडताना चांगल्या खेळाडूंना संधी देणे, योग्य वेळी निवड करणे हे जसे व्यवस्थापनाने करावे तसेच प्रत्येक खेळाडूने देशासाठी खेळण्याला महत्त्व द्यावे. संजू सॅमसनने मागील दोन्ही सामन्यांमध्ये केलेली कामगिरी ही अत्यंत महत्त्वाची आहे. शतकांसाठी नव्हे तर संघासाठी, देशासाठी खेळावे हेच त्याच्या खेळातून दिसते. टी-२० विश्वचषक सामन्यांचाच आढावा घेतला तर भारतीय संघाने अत्यंत लक्षवेधी कामगिरी केली आहे, हेही दिसून येते. आता लगेच आयपीएलचा हंगाम सुरू होईल. आयपीएलमधून भारतातील अनेक चांगले युवा खेळाडू समोर आले. दुर्लक्षित राहिलेल्या अनेक खेळाडूंचा शोध यापुढेही आयपीएलसारख्या स्पर्धांमधून सुरू राहो आणि भारतीय संघात चांगले खेळाडू येत राहोत, हीच अपेक्षा.