
भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान उच्च आहे. शिक्षकांकडे गुरुरूप म्हणून पाहिले जात असल्याने पाल्य आणि पालकांच्या नजरेत त्यांचे आदराचे स्थान असते. मात्र काही शिक्षक इतक्या नीच स्तराचे वर्तन करतात की, त्यांच्यामुळे शिक्षकीपेशाला बट्टा लागतो. असेच वर्तन धारवाडमधील एका शिक्षकाने केले आहे. दहावीची प्रश्नपत्रिका परीक्षेआधीच देण्याचे आमीष दाखवून तब्बल ८० ग्रॅम सोने विद्यार्थ्याकडून उकळले. याबाबत तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
धारवाड येथील के.ई. शिक्षण मंडळाच्या विद्यारण्य शाळेतील राजशेखर वडतेर या शिक्षकाने दहावी परीक्षेची प्रश्नपत्रिका देण्याचे आमिष दाखवून अभिषेक शिवानंद करकी या विद्यार्थ्याकडून तब्बल ८० ग्रॅम सोने उकळले. सुमारे १२ लाख रुपयांच्या किमतीचे हे सोने कुटुंबियांना न सांगता अभिषेकने शिक्षक वडतेरला दिले. करकी कुटुंबियांनी सोने चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. पोलिसांत तक्रार दाखल होताच अभिषेकने आत्महत्येचा प्रयत्न केला. आईने विचारणा केल्यानंतर अभिषेकने संपूर्ण प्रकार कथन केला. त्यानंतर कुटुंबियांनी पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
प्राथमिक माहितीनुसार, शिक्षक वडतेरने परीक्षेआधी प्रश्नपत्रिका देण्यासाठी रोख रकमेची मागणी केली होती. अभिषेकला रक्कम उभी करता न आल्याने वडतेरने घरातील सोने आणण्यास सांगितले. मौल्यवान वस्तू घरातून नेणे कठीण असल्याची भीती अभिषेकने व्यक्त केली असता, नंतर परत देऊ, असे आश्वासन वडतेरने दिले. आश्वासनावर विश्वास ठेवून अभिषेकने घरातील ८ तोळे (८० ग्रॅम) सोने, ज्याची किंमत सुमारे ११.९३ लाख रुपये आहे, ते शिक्षकाकडे दिले. कुटुंबियांनी सोने चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत दिल्यानंतर शिक्षक वडतेरने अभिषेकला ‘सोने परत मागितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील,’ अशी धमकी दिली. पोलिसांत तक्रार झाल्याचे कळताच आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या अभिषेकवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. वैद्यकीय उपचारांनंतर अभिषेकने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन शिक्षकाविरुद्ध तक्रार नोंदवली.
अभिषेकची आई सरोजिनी यांनी शिक्षण विभागाकडेही तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर नोंद घेऊन धारवाडच्या शालेय शिक्षण विभागाच्या उपसंचालकांनी के.ई. शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांना अधिकृत नोटीस बजावली. ‘संबंधित शिक्षकाची तत्काळ चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करा आणि तातडीने अहवाल सादर करा,’ असे या नोटिसीत म्हटले आहे. संबंधित शिक्षकाने इतर विद्यार्थ्यांनाही अशाच प्रकारे जाळ्यात ओढल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून प्रश्नपत्रिका फुटीच्या संशयावरून स्वतंत्र गुन्हाही दाखल होण्याची शक्यता आहे. शिक्षक-विद्यार्थी नात्यातील विश्वासाला तडा देणारी ही घटना शिक्षण व्यवस्थेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
- प्रदीप जोशी