
पश्चिम आशियाचा नकाशा सध्या रक्ताच्या डागांनी आणि धुराच्या ढगांनी झाकोळलेला दिसतो आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाने आता केवळ सीमारेषा ओलांडल्या नाहीत, तर संपूर्ण आखाती प्रदेशाला आपल्या विळख्यात घेतले आहे. ही ठिणगी इतकी भडकली आहे की, सायप्रसपासून ओमानपर्यंत अस्थिरतेची धग जाणवते आहे. हा केवळ लष्करी ताकदीचा सामना उरलेला नाही; तो कोट्यवधी निष्पाप नागरिकांच्या आयुष्याचा, त्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेचा आणि जागतिक शांततेच्या अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे.
इराणच्या प्रतिहल्ल्यांची व्याप्ती पाहिली तर परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो. तेल अवीवसारख्या इस्रायलमधील प्रमुख शहरांवर हल्ले झालेच; पण कतारची राजधानी दोहामध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोनच्या साहाय्याने स्फोट घडवून आणल्याच्या बातम्यांनी आखाती देश हादरले. कुवेतमधील अमेरिकेच्या आरिफजान लष्करी तळावर ड्रोन हल्ला करून इराणने थेट अमेरिकेलाच आव्हान दिल्याचे चित्र निर्माण झाले.
सौदी अरेबियातील तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांमुळे जागतिक तेलबाजारात अनिश्चिततेचे सावट दाटले. संयुक्त अरब अमिरातीतील मुसफ्फा विमानतळाजवळील स्फोट, तसेच दुबई आणि अबू धाबी परिसरातील घडामोडींमुळे हा प्रदेश व्यापार आणि पर्यटनासाठी सुरक्षित राहील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जॉर्डन आणि बहारिनमधील अमेरिकन तळांभोवती वाढलेली हालचाल आणि हल्ल्यांच्या बातम्यांमुळे संपूर्ण परिसर तणावाच्या कडेलोटावर उभा आहे.
या संघर्षाचा सर्वाधिक दाहक पैलू म्हणजे वाढती जीवितहानी. इराणमध्ये अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्यांनंतर जवळपास ७८७ नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती (दावा) समोर आली आहे, तर हजारो जखमी झाले आहेत. अनेक शहरांमध्ये उद्ध्वस्त इमारतींचे ढिगारे आणि रुग्णालयांतील आक्रोश या युद्धाचे भयावह वास्तव सांगत आहेत. इस्रायलमध्ये इराणी क्षेपणास्त्र हल्ल्यांत १२ जणांचा मृत्यू झाला असून ७७७ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. संयुक्त अरब अमिरातीमध्ये ५ जणांनी प्राण गमावले, तर ५८ जण गंभीर जखमी झाले. कुवेतमध्ये एका नागरिकाचा मृत्यू आणि ३२ जण जखमी झाल्याची नोंद आहे; तिथे तैनात असलेल्या ६ अमेरिकन सैनिकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. लेबनॉनमध्ये ५२ जणांचा बळी गेला असून १५३ जखमी आहेत. बहारिन, कतार, जॉर्डन आणि ओमानमध्येही कमी-अधिक प्रमाणात जीवितहानी झाली आहे.
हे युद्ध केवळ क्षेपणास्त्रांची देवाणघेवाण नाही; ते जागतिक मुत्सद्देगिरीचे आणि मानवी संवेदनांचे अपयश अधोरेखित करणारे वास्तव आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगाचा मोठा ऊर्जा पुरवठा आणि व्यापार मार्ग चालतो. तिथे निर्माण झालेली भीती जागतिक अर्थव्यवस्थेलाही हादरा देणारी ठरू शकते. सामान्य नागरिकांना घरे सोडावी लागत आहेत; अन्न, औषधे आणि इंधनाचा तुटवडा अनेक भागांत जाणवू लागला आहे. सायप्रससारख्या तुलनेने दूरच्या देशातही तणावाची छाया दिसू लागणे हे या संघर्षाच्या व्यापकतेचे लक्षण आहे.
- सचिन दळवी