काँग्रेस राजकीय वनवास संपवण्याच्या निर्धारात

Story: राज्यरंग |
02nd March, 10:23 pm
काँग्रेस राजकीय वनवास संपवण्याच्या निर्धारात

आसाममध्ये लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मतदानापूर्वीच महत्त्वाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने चर्चेला उधाण आले असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी मोहीम आखत आहे. तर काँग्रेस गेल्या दशकापासून सत्तेबाहेर असून हा राजकीय ‘वनवास’ संपवण्याच्या निर्धारात आहे.

आसाम विधानसभेत परिसीमनानंतर एकूण जागा १२६ इतक्याच कायम असल्या तरी मतदारसंघांच्या रचनेत मोठे बदल झाले आहेत. पूर्वी सुमारे ३५ मुस्लिमबहुल मतदारसंघ होते; नव्या सीमारेषांनंतर ही संख्या २२ वर आली आहे. या जागांवर काँग्रेसची पारंपरिक ताकद मानली जात होती. अनुसूचित जातींच्या राखीव जागा ८ वरून ९ झाल्या आहेत, तर अनुसूचित जमातींसाठीच्या जागा १६ वरून १९ पर्यंत वाढल्या आहेत.

२०२१ च्या निवडणुकीत सुमारे ३१ मुस्लिम आमदार निवडून आले होते. नव्या मतदारसंघ रचनेनुसार ही संख्या सुमारे २४ पर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुस्लिमबहुल जागा कमी झाल्या असताना जवळपास १० हिंदूबहुल मतदारसंघांची भर पडली आहे. त्यामुळे काँग्रेससमोर केवळ पारंपरिक मतांवर विसंबून न राहता व्यापक सामाजिक समीकरणे साधण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात प्रियंका गांधी यांनी गुवाहाटीतील नीलांचल टेकडीवरील कामाख्या मंदिरात पूजा करून केली. या कृतीकडे हिंदू मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून पाहिले जात आहे.

काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि नेत्यांची गळती ही पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. भूपेन बोरा यांच्या  राजीनाम्यानंतर पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यांना रोखण्याचे प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी ठरले नाहीत. बोरा आणि हिमंत बिस्वा सरमा हे पूर्वी काँग्रेसमध्ये एकत्र काम केलेले असल्याने त्यांच्या संभाव्य राजकीय समीकरणाकडे विशेष लक्ष लागले आहे.

भूपेन बोरा यांच्या पाठोपाठ राशिद मंडल यांनीही काँग्रेसचा निरोप घेतला. गोलपाडा पश्चिम मतदारसंघातून तीन वेळा निवडून आलेल्या मंडल यांचा त्या भागात प्रभाव मानला जातो. आणखी काही नेते भाजपमध्ये दाखल होऊ शकतात, असा दावा स्वतः मुख्यमंत्री सरमा यांनी केला आहे.

आसाममध्ये सुमारे २७ टक्के मुस्लिम मतदार आहेत. मात्र काँग्रेसला या मतांसाठी ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट आणि रायजोर दल या पक्षांशी स्पर्धा करावी लागणार आहे. २०२१ मध्ये काँग्रेस आणि एआययूडीएफ युतीत लढले होते; मात्र यंदा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरत आहेत. त्यामुळे मुस्लिम मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.

एकंदरीत, आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे, तर भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या निर्धाराने रणांगणात उतरली आहे.

- प्रसन्ना कोचरेकर