एखादे झेपेल असे आकाराने, उंचीने लहान झाडही होळीसाठी वापरता येईल, जेणेकरून पर्यावरणपूरक ती होईलच; पण सुरक्षित होळीही होईल. मेणकुरेच्या घटनेतून होळी साजरी करण्याच्या धोकादायक परंपरांबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे.

गोवा, कोकणात होळीची परंपरा ही इतर राज्यांपेक्षा वेगळी. फक्त धुलिवंदन किंवा पुरणपोळीचा उपाहार म्हणजेच होळी असे नाही. या भागांत होळीचा सण हा इतर सणांपेक्षा वेगळा आणि त्याचे महत्त्वही तेवढेच वेगळे. रुढी, परंपरा जपतच आज अनेक गावांमध्ये होळी साजरी केली जाते. कित्येक गावांमध्ये मोठे झाड, पोफळी ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत आणणे आणि ती देवस्थानाच्या प्रांगणात उभी करणे, अशा परंपरा सुरू आहेत. काही वेळा पर्यावरणाची हानी करणारी ही परंपरा आहे, असाही विचार मनात येईल, पण तिथल्या परंपरा पाहिल्यानंतर त्याविरोधात बोलण्याचेही धाडस लोक करत नाहीत. त्यातल्या त्यात गेल्या काही वर्षांमध्ये काही बदल मात्र निश्चितच होत आहेत. पेडणेतील भगवती मंदिर समितीने आंब्याचे झाड तोडण्यापेक्षा एक फांदीच तोडून होळी साजरी करावी, असा चांगला निर्णय घेतला. काही गावांमध्ये मोठे उंच झाड तोडण्यापेक्षा एखादे लहान झाड तोडून होळी साजरी करण्याचेही निर्णय घेतले गेले. त्यामुळे निश्चितच होळीची परंपरा आता बदलत चालली आहे, असा त्यातून एक निष्कर्ष काढता येईल. एकेकाळी होळीसाठी काम करणारे लोकही चांगले धडधाकट होते आणि त्यासाठी जंगलात जाऊन होळीसाठी भली मोठी झाडेही तोडली जायची. एकेक पिढी कालबाह्य होऊ लागल्यामुळे आता नवी पिढी या परंपरा, रुढी पूर्वीसारख्याच जपतील याची शाश्वती नाही. ते ज्ञानही नव्या पिढीकडे आलेले नाही किंवा कशा पद्धतीने आता अशा परंपरा हाताळाव्यात, त्याचेही भान नाही. त्यावर उपाय हा एकच तो म्हणजे, सर्वांना झेपेल अशाच होळीचा हट्ट धरायचा. उगाच मोठी झाडे तोडून होळी उभी करताना जीवावर बेततील असे प्रसंग उद्भवणार नाहीत, याची काळजी घ्यायची. परंपरांना फाटा देताना थोडा श्रद्धेचा दबावही येईल. भीती वाटेल. पण नव्या पिढीला सुरक्षित होळी साजरी करण्यासाठी उत्साहाने सहभागी होता येईल, अशा पद्धती अवलंबणे गरजेचे आहे.
डिचोली तालुक्यातील मेणकुरे गावात होळी उभी करताना घडलेल्या दुर्घटनेत एका तरुणाला जीव गमवावा लागला. काम जरी गावाचे असले तरी या दुर्घटनेत एका कुटुंबाचा आधार गेला. कमावता हात गेला. या घटनेनंतर खरोखरच होळीसाठी किंवा होळीच्या नावाखाली मोठी झाडे तोडून जीवाचा आटापिटा करून ती उभी करण्यासाठी कसरत करण्याची गरज आहे का, याचा विचार व्हायला हवा. यासाठी प्रत्येक देवस्थान समित्यांनी, तिथल्या गावकरी व्यवस्थेने यावर सखोल चर्चा करायला हवी. एखादे झेपेल असे आकाराने, उंचीने लहान झाडही होळीसाठी वापरता येईल, जेणेकरून पर्यावरणपूरक ती होईलच; पण सुरक्षित होळीही होईल.
मेणकुरेच्या घटनेतून होळी साजरी करण्याच्या धोकादायक परंपरांबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे. मेणकुरेचा विषय बातमीतून समोर आला असला तरी अशा दुर्घटना दरवर्षी कुठे ना कुठे होत असतात. त्या समोर येतातच असे नाही. जुन्या जाणत्या लोकांनी श्रद्धेने मोठमोठी झाडे होळीसाठी आणलेली उदाहरणे सांगितली जातात. पण नव्या पिढीला हे झेपेल का? होळी उभी करण्याची एक पद्धत असते, त्यावेळी तोल बिघडला तर मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे अशा कामांसाठी ज्ञान असणाऱ्यांचीच गरज असते. त्यामुळे आता बदलत्या काळानुसार होळीचे स्वरूपही बदलण्याची गरज आहे. फक्त होळी म्हणून मोठी झाडे तोडून, कसरत करून ती होळी म्हणून उभी करण्याचेच नव्हे, तर होळीच्या नावाखाली रस्त्यांवर वाहने अडवून लोकांशी हुज्जत घालण्याचे प्रकारही थांबायला हवेत. शिमग्याच्या काळात दारोदारी जाऊन शबै घालण्याची परंपरा रस्त्यावर उभे राहून जीव धोक्यात घालून वाहने अडवण्यापर्यंत कधी आली, ते कोणालाच कळलेले नाही. रंग लावण्याच्या नावाखाली हवे तसे वागण्याची परपंराही हल्ली दिसत आहे. परंपरांनी समृद्ध असलेल्या शिमग्याला अशा काही घटनांमुळे गालबोट लागत असते. त्या आधीच टाळल्या, तर सुरक्षित होळी साजरी होऊ शकते. गोव्यात, कोकणात होळीच्या परंपरा फारच रहस्यमयी आहेत. त्यांचे पावित्र्य जपून त्या साजऱ्या केल्या जातील आणि पुढच्या पिढीकडे त्या सोपवल्या जातील, यासाठी सुरक्षेचा विचार करण्याची जास्त गरज आहे.