
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत २०४७’च्या धर्तीवर ‘विकसित गोवा २०३७’चे लक्ष्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठेवले आहे. ‘विकसित गोवा २०३७’ करण्याच्या उद्देशाने गोवा सरकारने ‘स्वयंपूर्ण गोवा’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्यात भाजी आणि दुधाचे उत्पादन वाढल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. याद्वारेच गोवा मत्स्योद्योगातही स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. भाजी व शेतीचे उत्पादन वाढावे, शेती करणाऱ्यांचे प्रमाण वाढावे, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी तसेच दूध उत्पादकांसाठी बऱ्याच योजना आहेत. या योजनांचा बरेच शेतकरी लाभ घेत आहेत. यामुळे हळूहळू पडीक जमीन लागवडीखाली येऊ लागली आहे.
पर्यटन व खाण हे गोव्याचे दोन प्रमुख व्यवसाय आहेत. यापैकी खाण व्यवसाय हा दहा वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद झाला. आता तो काही प्रमाणात सुरू होत आहे. तरी खाण व्यवसायात पूर्वी जो जोम होता, तो आता उरलेला नाही. डिचोली, सांगे व केपे तालुक्यातील जनजीवन या व्यवसायावर अवलंबून होते. काहींच्या कायमस्वरूपी नोकऱ्या होत्या, तर काही जण ट्रक व्यवसायात होते. दुकाने, गॅरेज, हॉटेल आणि स्थानिक बाजारपेठा यामुळे तेजीत होत्या. मात्र, आता परिस्थिती बदललेली आहे. गेल्या काही वर्षांत मोठ्या उद्योगांना झालेल्या विरोधामुळे नवीन प्रकल्प उभे राहू शकले नाहीत. परिणामी, गोमंतकीयांना पुन्हा शेती, बागायतीचीच कास धरावी लागणार आहे.
शेती, बागायती हा गोमंतकीयांचा पारंपरिक व्यवसाय आहे. पेडणे, बार्देश, डिचोली, सत्तरी, सांगे, काणकोण, फोंडा, सासष्टी या तालुक्यांतील ग्रामीण भागात मूळ गोमंतकीयांकडे थोडीतरी जमीन होती. काहींच्या जमिनीत नारळ-पोफळीची झाडे तर काहींच्या जमिनीत काजू-आंब्यांची झाडे होती. काही जणांकडे शेतजमीन होती. गोवा मुक्तीनंतर शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे शिक्षण व पदव्यांचे प्रमाण वाढले. बरेच जण नोकरी करू लागले. काही जणांनी स्वत:चे व्यवसाय सुरू केले. यात पुन्हा खाण व्यवसाय व औद्योगिक वसाहतींमुळे कमी शिक्षण असणाऱ्यांनाही नोकरी मिळू लागली. यामुळे शेती, बागायतीकडे दुर्लक्ष झाले. यात पुन्हा कामगारांची मजुरी वाढली. कामगारांची संख्या कमी झाली. उत्पन्नाच्या तुलनेत मजुरी परवडेनाशी झाली. यामुळे शेतजमीन पडीक ठेवण्याचे प्रमाण वाढले. यात पुन्हा ‘सुशेगाद’ वृत्तीमुळे नांगरणी तसेच इतर कामे करणे गोमंतकीयांनी सोडून दिले. आता विज्ञान व तंत्रज्ञानामुळे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग सुरू होत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. आधुनिक तंत्रज्ञान व योजनांचा लाभ घेतल्यास शेती किफायतशीर बनू शकते, हे वरद सामंत यांच्यासारख्या शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. पडीक शेतजमीन लागवडीखाली आणून शेती, दूध व भाज्यांमध्ये राज्याला स्वयंपूर्ण बनवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी राज्याला स्वयंपूर्ण बनवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन आव्हान म्हणून स्वीकारायला हवे.
- गणेश जावडेकर