देवा, तुझ्या मुखकमलातून जे शब्द निघतात ते म्हणजे मूर्तिमंत नादब्रह्मच होय! अनाहत नाद ही ईश्वर-साक्षात्काराची खूण - पूर्वसूचना आहे. या नादाच्या अनुसंधानाने पूर्ण साक्षात्कार होतो. म्हणून नादाला ब्रह्म म्हटले आहे.

वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः।
याभिर्विभूतिभिर्लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठसि।।१६।।
सरळ अर्थ : हे भगवन्, ज्या विभूतींनी या लोकांना व्यापून तुम्ही स्थित आहात, त्या आपल्या दिव्य विभूतींना संपूर्णपणे सांगण्यास आपणच योग्य आहात.
विस्तृत विवेचन : कुंतीपुत्र पार्थ म्हणतोय, हे कृष्णा, एरवी या सकल विश्वातील सगळ्या गोष्टी या तुझ्याच विभूती आहेत. विभूती म्हणजे ईश्वरांश होय. ईश्वरी सामर्थ्य किंवा वैभव ज्यांच्यात प्रकर्षाने दिसते अशा वस्तू व व्यक्ती. सर्व काही परमेश्वरच नटला आहे म्हणून सर्वच काही ईश्वराच्या विभूती आहेत, पण ज्यात ईश्वरी वैभव प्रकट दिसते अशांनाच विभूती म्हटले जाते. पण त्यांच्यामधील ज्यांच्या ज्यांच्यामधे तुझ्या दिव्यत्वाचे विशेष प्रकटीकरण आहे किंवा दिसून येते; ज्या ज्या विभूतींनी हे समस्त लोक व्यापूनही तू एकच एक राहिला आहेस, त्या त्या मुख्य आणि नामांकित विभूती मला सांग.
कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिंतयन्।
केषु केषु च भावेषु चिन्त्योसि भगवन्मया।।१७।।
सरळ अर्थ : हे योगेश्वरा, मी कशा रीतीने निरंतर चिंतन करीत आपणाला जाणावे आणि हे भगवंता कोणत्या कोणत्या भावांनी माझ्याकडून चिंतन करण्यास आपण योग्य आहात?
विस्तृत विवेचन : तुझे चिंतन कसे करावे ही विवंचना मला लागली आहे. तुझा तर सगळ्यांच्याच ठायी नित्य वास असतो (म्हणजे वसती असते). पण मग सगळ्यांचेच चिंतन कसे करायचे? म्हणून तू पूर्वी जे मला तुझे भाव थोडक्यात सांगितले होते, तेच जरी आता विस्तारपूर्वक सांगितले, तर फार बरे होईल. म्हणून हे चक्रपाणी, ज्या ज्या विभूतींचे चिंतन केल्यावर सहजपणे तुझे चिंतन होऊ शकेल, त्या त्या तुझ्या विभूती मला कृपया तपशीलवार सांग.
विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन।
भूय: कथय तृप्तिर्हि श्रृण्वतो नास्ति मेsमृतम्।।१८।।
सरळ अर्थ : आणि हे योगेश्वरा, आपल्या योगशक्तीला व परमैश्वर्यरूप विभूतींना फिरूनही विस्तारपूर्वक सांगा. कारण आपल्या अमृतमय वचनांना ऐकत असता माझी तृप्ती होत नाही. अर्थात् ऐकण्याची उत्कंठा तशीच लागून राहते.
विस्तृत विवेचन : आणि हे जगन्नाथा, मी तुला जो विभूतींचा विस्तार विचारला आहे, तोही मला सांग. याला परत तेच तेच किती सांगायचे अशा विचाराची कल्पनाही हे जनार्दना मनात येऊ देऊ नकोस. अरे, जे साधे सर्वसामान्य अमृत, तेही "आता पुरे, बास झाले!" असे म्हणता येत नाही. अतिज्वलज्जहाल महाभयंकर विष जे काळकूट, त्याचे हे (अमृत) भावंड! स्वर्गनिवासी देव आपल्याला मृत्यू येऊ नये म्हणून त्याचे प्राशन करतात. पण तरीही ब्रह्मदेवाच्या एकाच दिवसात देव-वस्तींच्या स्वर्गासकट चौदा इंद्र जन्माला येऊन नाहीसे होतात. अमृतालाही मर्यादा असते हे इथे जाणवून दिले आहे.
म्हणजे अमृतपणाचा ज्याला व्यर्थ भास आहे, तो जो क्षीराब्धीचा रस, त्याच्याही गोडीबद्दल "आता पुरे झाली बुवा!" असे जीवाला कधीही म्हणावेसे वाटत नाही. त्या क्षुद्र अमृताचा इतका बडेजाव! आणि कृष्णा तुझे वचन तर साक्षात परम अमृत! आणि हे परमामृत असे आहे की जे मंदर पर्वताची रवी न करता आणि क्षीराब्धीला न घुसळता आयतेच मिळणारे असे अनादी, स्वयमेव सिद्ध, जे द्रवरुपी नाही, जे बद्ध नाही, ज्याला रस-गंधाची वार्ताही नाही, पण जे नुसते स्मरण करताच कुणालाही प्राप्त होते आणि ज्याला साक्षात ऐकताच अवघा संसार हा असार होऊन जातो आणि जो सर्वश्रेष्ठ असा अविनाशपणा तो तिथल्या तिथेच पूर्णपणे लाभतो; जन्म-मरणाचा विषय सर्वथा हारपून जातो; जो ऐकला असता एकच नित्य ब्रह्मसुख अंतर्बाह्य वाढीस लागते; थोर भाग्य लाभल्याने तेच परम अमृत प्रत्यक्ष सेवन करण्याचा योग आला की सेवनकर्त्याला तात्काळ तद्रूपता प्राप्त होते; इतके थोर परमामृत तू मला आज इथे पाजत आहेस, त्याला मी "पुरे झाले आता!" असे कसा म्हणू?
तुझे नाव तर आम्हाला आवडतेच. वरून दैवयोगाने तू आम्हाला प्रत्यक्ष भेटलास! त्यातही तुझा आम्हाला आजपर्यंत नित्य सहवास घडला! आणि आता आनंदभरात तू आम्हाला हे बोधामृत पाजतो आहेस. या सुखाच्या गोडीचे वर्णन कसे करू? या सुखाच्या योगाने साहजिकच आंतरिक समाधान मिळते. म्हणून हे दयाघना, कितीही पुनरुक्ती जरी होत असली, तरी त्या विभूती मला कृपया सांग. दररोज आकाशात न चुकता उगवतो म्हणून सूर्य कोणी शिळा झाला असे म्हणतो का? किंवा अग्निनारायणाने आंघोळ नाही केली म्हणून त्याला कोणी ओवळा समजतो का? किंवा गंगेचे पाणी नित्य नियमित वाहते म्हणून ते शिळे झाले आहे, असे कोणी म्हणतो का? देवा, तुझ्या मुखकमलातून जे शब्द निघतात ते म्हणजे मूर्तिमंत नादब्रह्मच होय! अनाहत नाद ही ईश्वर-साक्षात्काराची खूण - पूर्वसूचना आहे. या नादाच्या अनुसंधानाने पूर्ण साक्षात्कार होतो, म्हणून नादाला ब्रह्म म्हटले आहे.
चंदनाचे फूल हुंगावे तसे तुझे बोल सुगंधित असतात! प्रियसखा अर्जुनाचे हे भाषण, बोलणे ऐकून कृष्ण साहजिकच सर्वांगाने डोलायला लागला. ब्रह्मज्ञानाचे श्रवण करायला सर्वार्थाने हा अर्जुनच आता (सु-बीज पेरण्यासाठी सुपीक जमीन असावी तसा) सत्पात्र, योग्य अधिकारी झालेला दिसतोय, असे तो मनात म्हणू लागला. आपल्या प्रिय सख्याचा, प्रिय भक्ताचा झालेला तो संतोष बघून तो प्रेम-सिंधु-ईश्वर उचंबळून आला. पण तरीही स्वतःचा तो प्रेमावेग आवरून तो श्रीरंग आता पुढे काय म्हणतोय ते पाहूया.
(क्रमशः)

- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३