
गोव्याची ओळख केवळ फेसाळणारे समुद्रकिनारे एवढीच मर्यादित नसून, येथील खरी संस्कृती ग्रामीण जीवनात आणि प्राचीन परंपरांमध्ये दडलेली आहे. हेच ग्रामीण वैभव जगासमोर मांडण्याचे आणि पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य दक्षिण गोव्यातील लोटली येथील 'अँसेस्ट्रल गोवा - बिग फूट' हे संग्रहालय करत आहे. प्रख्यात कलाकार महेंद्र अल्वारीस यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे खुले संग्रहालय गोव्याच्या 'लिव्हिंग हेरिटेज'चे जिवंत प्रतीक ठरत आहे.
या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण म्हणजे जांभ्या दगडातील संत मीराबाईंचे भव्य शिल्प. १४ मीटर लांबीचे हे शिल्प भारतातील अशा प्रकारचे सर्वात मोठे कोरीवकाम असून, याची नोंद 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये करण्यात आली आहे. या कलाकृतीद्वारे भारतीय अध्यात्म आणि स्थानिक पाषाण कलेचा सुरेख संगम साधला गेला आहे.
बिग फूटने १०० वर्षांपूर्वीच्या गोव्यातील एका आदर्श गावाचे हुबेहूब चित्रण केले आहे. यात मच्छीमार, कुंभार, शेतकरी आणि इतर ग्रामीण कारागिरांचे देखावे साकारले असून, त्या काळातील जीवनशैली आणि अर्थव्यवस्थेची माहिती नव्या पिढीला मिळते. तसेच, गणेशोत्सव, नाताळ, सांजाव यांसारख्या सणांची माहिती देणारी शिल्पे गोव्यातील सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडवतात. जुन्या लोककलांना जिवंत ठेवण्यासाठी येथे पारंपरिक खेळांचे व नाटकांचे आयोजन केले जाते.
हे केंद्र केवळ पर्यटन स्थळ नसून रोजगारनिर्मितीचे एक प्रभावी मॉडेल आहे. स्थानिक कारागिरांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि उत्पादने विकण्यासाठी येथे हक्काचे व्यासपीठ मिळते. 'बिग फूट'च्या पावलाच्या ठशामागे असलेली महादारची आख्यायिका पर्यटकांना दया, निस्वार्थ भक्ती आणि प्रामाणिकपणा यांसारख्या मानवी मूल्यांची शिकवण देते.
महेंद्र अल्वारीस यांच्या संकल्पनेतून येथे विविध कार्यशाळा आणि शालेय सहलींचे आयोजन केले जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना आपला इतिहास प्रत्यक्ष अनुभवता येतो. गोव्याच्या संस्कृतीला आधुनिक युगात 'ब्रँड' म्हणून टिकवून ठेवण्यात या संग्रहालयाचा मोठा वाटा आहे. राज्य सरकारनेही अशा प्रकारच्या मॉडेलचा अभ्यास करून अन्य ठिकाणी अशा केंद्रांची निर्मिती केल्यास, पर्यटनाला चालना मिळण्यासोबतच गोव्याचा समृद्ध वारसा पिढ्यानपिढ्या जिवंत राहील.
- अजय लाड