
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताला विजेतेपद मिळवून देताना संजू सॅमसनने नॉकआउट सामन्यांमध्ये केलेल्या दमदार फलंदाजीमुळे स्वतःचे नाव इतिहासात कोरले आहे. केवळ तीन नॉकआउट सामन्यांमध्ये सॅमसनने अशी कामगिरी केली, जिने केवळ त्याच्या कारकिर्दीची दिशा बदलली नाही, तर त्याने संपूर्ण विश्वचषकावर आपली छाप उमटवली.
विश्वचषकाच्या सुरुवातीला सॅमसन अंतिम अकरामध्येही नव्हता. याआधी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याची कामगिरी निराशाजनक ठरली होती. जानेवारीत त्याने १०, ६, ०, २४ आणि ६ अशी धावसंख्या केल्यामुळे त्याला संघातून बाहेर बसावे लागले होते. त्यावेळी भारताचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सांगितले होते की, ‘सॅमसन नेटमध्ये चांगली फलंदाजी करतो.’ क्रिकेटमध्ये हे अनेकदा खेळाडूसाठी अप्रत्यक्ष टीकेसारखे मानले जाते. मात्र, स्पर्धेच्या सुपर-८ टप्प्यात संधी मिळताच त्याने तिचे सोने केले.
तीन नॉकआउट सामन्यांत सॅमसनने १९९ च्या स्ट्राइक रेटने २७५ धावा केल्या. भारताकडून दुसऱ्या क्रमांकावर असलेला इशान किशन फक्त १०३ धावा करू शकला. म्हणजेच सॅमसनची धावसंख्या त्याच्या तुलनेत तब्बल १६७ टक्क्यांनी अधिक होती. स्पर्धेत तो फक्त पाच डाव खेळला, तरीही ३२१ धावांसह तो एकूण धावांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिला. पाच किंवा त्यापेक्षा कमी डाव खेळून इतक्या वरच्या क्रमांकावर पोहोचणारा तो एकमेव फलंदाज ठरला.
सॅमसनने उपांत्य आणि अंतिम सामन्यात मिळून १७८ धावा केल्या. ही कोणत्याही टी-२० विश्वचषकातील नॉकआउट फेरीत केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. २०१४ मध्ये विराट कोहलीने केलेल्या कामगिरीपेक्षा सॅमसनची आकडेवारी २३ टक्क्यांनी अधिक प्रभावी ठरली. किमान ७५ चेंडू खेळलेल्या फलंदाजीमध्ये फिन अॅलन (२००) नंतर १७५ हून अधिक स्ट्राइक रेट राखणारा सॅमसन दुसरा फलंदाज ठरला. सुपर ८ सामन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने ९७ धावा केल्या, ही कोणत्याही भारतीय खेळाडूची टी-२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळी होती. उपांत्य सामन्यात इंग्लंडविरुद्ध त्याने आक्रमक फलंदाजी करत ४२ चेंडूत ८९ धावा केल्या. अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध त्याने ४६ चेंडूत ८९ धावा केल्या. या डावामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. या कामगिरीमुळे सॅमसनचे नाव आता विश्वचषकातील महान नॉकआउट खेळाडूंमध्ये घेतले जात आहे. या यादीत आतापर्यंत विव्ह रिचर्ड्स, मोहिंदर अमरनाथ, शेन वॉर्न, अरविंदा डी सिल्वा, शाहिद आफ्रिदी, ट्रॅव्हिस हेड यांचा समावेश होता. त्यांच्या पंक्तीत आता सॅमसनचे नावही घेतले जात आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीला संघातही स्थान नसलेला संजू सॅमसन नॉकआउट सामन्यांचा खरा ‘धुरंधर’ ठरला. त्याने केवळ भारताला विजेतेपद मिळवून दिले नाही, तर आक्रमक आणि धाडसी फलंदाजीचे नवे मापदंडही तयार केले.
- प्रवीण साठे