क्रिकेटच्या मैदानावर आता भारताचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. आगामी काळातही भारतीय क्रिकेटची ही घोडदौड अशीच सुरू राहील, अशीच अपेक्षा आहे. कारण आज भारताकडे प्रतिभावान खेळाडू, मजबूत पायाभूत सुविधा आणि जिंकण्याची जिद्द या सर्व गोष्टी आहेत.

जागतिक क्रिकेटच्या इतिहासात अनेक संस्मरणीय क्षण घडले आहेत किंवा घडताना आपण पहात आहोत. काही स्पर्धा अशा असतात की त्या केवळ विजयापुरत्या मर्यादित राहत नाहीत; त्या एका नव्या युगाची सुरुवात करतात. रविवारी ८ मार्चला संपलेली विश्वचषक क्रिकेट टी-२० स्पर्धा अशीच आम्हा सगळ्यांसाठी संस्मरणीय ठरली. या स्पर्धेत भारतीय संघाने केवळ विश्वविजेतेपद मिळवले नाही, तर जगातील क्रिकेट शक्तींना स्पष्ट संदेश दिला तो असा की, आजच्या घडीला क्रिकेटमध्ये भारत हीच सर्वात मोठी ताकद आहे, महाशक्ती आहे. मर्यादित षटकांच्या स्पर्धेतील विश्वचषक तिसऱ्यांदा जिंकताना आपल्या सूर्यकुमारच्या संघाने जो महापराक्रम केला आहे तो पहाता असे म्हणावेसे वाटते की, इतिहासानेच भारतीय क्रिकेटसमोर गुडघे टेकून शरणागती पत्करली आहे. या विश्वचषकाची सुरुवात होताना भारतीय संघाने एक अनोखी पंचलाईन दिली होती 'हिस्टरी रिपीट करेंगे, हिस्टरी डिफीट करेंगे.' या पंचलाईनमध्ये भारतीय संघाचा आत्मविश्वास दडलेला होता. भूतकाळातील यशाची पुनरावृत्ती करायची आणि प्रतिस्पर्ध्यांच्या इतिहासालाही मागे टाकायचे, हा या संघाचा स्पष्ट निर्धार होता. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय वीरांनी हाच निर्धार मैदानावर प्रत्यक्ष कृतीत उतरवला. या विश्वचषकात भारताने दाखवलेला खेळ केवळ कौशल्याचा नव्हता, तर तो शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावनेचा उत्कृष्ट नमुना होता. फलंदाजीत असो, गोलंदाजीत असो किंवा क्षेत्ररक्षणात, भारतीय संघाने सर्वच आघाड्यांवर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले. भारताच्या फलंदाजांनी सातत्याने मोठ्या धावा केल्या, तर गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघांना दबावाखाली ठेवत निर्णायक क्षणी बळी मिळवले, त्यामुळे बलाढ्यांतल्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांनाही भारतासमोर उभे राहणे अवघड झाले आणि अखेर इतिहास नव्याने लिहिला गेला.
क्रिकेटच्या पारंपरिक महासत्ता मानल्या जाणाऱ्या इंग्लंड आदी संघांविरुद्ध भारताने केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. ऑस्ट्रेलियासारखा संघ तर साखळी गटातच बाहेर पडावा, यावरून आजची स्पर्धा किती अवघड ठरली आहे हे कळून येते. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आदि संघांनीही अनेक दशकांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर कसे वर्चस्व गाजवले, हे नव्याने सांगायची गरज नाही. परंतु, या स्पर्धेत भारतीय संघाने जे निर्विवाद श्रेष्ठत्व गाजवले आणि भारतीय क्रिकेटला एका नव्या वैभव शिखरावर नेऊन ठेवले आहे ते पहाता, आपले क्रिकेटपटू निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.
विशेष म्हणजे, भारताचा हा यशस्वी प्रवास अचानक घडलेला नाही. मागील तीन-चार वर्षांपासून भारतीय क्रिकेट सातत्याने प्रगतीच्या शिखरावर पोहोचत आहे. विविध स्तरांवर पुरुष संघ, महिला संघ तसेच कनिष्ठ स्तरांवरील स्पर्धांमध्ये भारताने जागतिक विजेतेपदे मिळवली आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटची ताकद केवळ एका संघापुरती मर्यादित राहिलेली नाही; ती संपूर्ण व्यवस्थेची ताकद बनली आहे. भारतीय क्रिकेटच्या या यशामागे अनेक घटक कार्यरत आहेत. सर्वप्रथम म्हणजे भारतीय क्रिकेट मंडळाची मजबूत संरचना. देशभरात उभारण्यात आलेली आधुनिक क्रिकेट अकादमी, उत्कृष्ट प्रशिक्षक आणि वैज्ञानिक पद्धतीने दिले जाणारे प्रशिक्षण यामुळे नव्या पिढीतील खेळाडूंना मोठ्या संधी मिळत आहेत. ग्रामीण भागापासून महानगरांपर्यंत क्रिकेटची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. त्यामुळे प्रतिभावान खेळाडू शोधणे आणि त्यांना घडवणे अधिक सोपे झाले आहे. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, आयपीएलसारखी स्पर्धा. भारतात क्रिकेट हा केवळ खेळ नसून तो एक संस्कृती बनला आहे. लाखो तरुण क्रिकेटला करिअर म्हणून स्वीकारत आहेत आणि देशासाठी खेळण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेटची ताकद दिवसेंदिवस वाढतच आहे.
या विश्वचषकाने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, आता क्रिकेटच्या नकाशावर भारत केवळ एक मजबूत संघ नाही, तर तो एक महाशक्ती आहे. 'हिस्टरी रिपीट करेंगे, हिस्टरी डिफीट करेंगे' हे सांगणे तसे सोपे होते, पण प्रत्यक्षात कृतीत आणणे अशक्यच होते. यजमान देशाच्या संघाच्या खेळाडूंवर अपेक्षांचे जे ओझे असते त्या ओझ्याखाली दडपून जाणे स्वाभाविकच असते, त्यामुळेच आतापर्यंत यजमान देश कधीही स्पर्धा जिंकू शकला नाही, हे वास्तव स्वीकारणे भाग होते आणि भारतासारख्या खंडप्राय देशात जेथे क्रिकेट हाच धर्म मानला जातो तेथे तर यजमान संघाकडून अपेक्षा करणे म्हणजे कोणीही मूर्खात काढण्यासारखेच होते. पण, येथेही आपण जिंकलो. यजमान देशही विश्वचषक स्पर्धा जिंकू शकतो, हेच भारतीय वीरांनी दाखवून दिले. भारतीय खेळाडूंनी जगाला दाखवून दिले की, क्रिकेटच्या मैदानावर आता भारताचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. आगामी काळातही भारतीय क्रिकेटची ही घोडदौड अशीच सुरू राहील, अशीच अपेक्षा आहे. कारण आज भारताकडे प्रतिभावान खेळाडू, मजबूत पायाभूत सुविधा आणि जिंकण्याची जिद्द या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या भविष्यातील इतिहासात भारताचे नाव अधिक तेजाने झळकणार, यात शंका नाही.
आपण दोन वर्षांआधी जिंकलेला विश्वचषक राखला, तब्बल तिसऱ्यांदा तो जिंकला आणि यजमान असूनही दडपणाला न जुमानता त्यावर नाव कोरले, हे सर्व सहजसाध्य झालेले नाही तर त्यामागील प्रचंड मेहनत कामी आली. संघ भावनेतून साकारले गेलेले हे यश असल्याने विशिष्ट खेळाडूंचा नामनिर्देश करणे योग्य ठरणार नाही, पण जसप्रीत बुमरा, संजू सॅमसन यांची या स्पर्धेतील कामगिरी कोणाच्याही विस्मरणात जाणार नाही. या विश्वचषकाची सुरुवात फारशी उत्साहवर्धक नव्हती. बांगलादेशने स्पर्धेतून माघार घेतली आणि पाकिस्तानमुळे काहीसा तणाव निर्माण झाला. पण जसजशी स्पर्धा पुढे सरकत गेली, तसतसे खेळानेच सर्वांवर वर्चस्व मिळवले. सोशल मीडियावरून दिसून येते की, हे सामने पाकिस्तानमध्येही मोठ्या उत्साहाने पाहिले गेले. खेळ जगाला सांगण्याचा एक मार्ग आहे की एकमेकांशी संवाद साधण्यासाठी युद्ध करण्यापेक्षा अनेक चांगले मार्ग असतात. क्रिकेटमध्ये नवीन वैभव शिखर आपण गाठले आहे. भारतीय क्रिकेटप्रेमींना आता आपला संघ कायम तेथेच स्थिरावलेला हवा आहे. अपेक्षांचे ओझे हे असेच असते. एकेकाळी ब्राझीलमध्ये फुटबॉलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येणेही शोकांतिका मानली जात होती. राष्ट्रीय अपेक्षा नेहमी जिंकण्याच्या असतात. भारतातही क्रिकेटमध्ये लोकांच्या अपेक्षा अशाच अवास्तव पातळीवर पोहोचल्या आहेत. खेळात विजय आणि पराभवही असतो, हे वास्तव स्वीकारूनच पुढे जावे लागेल.

- वामन प्रभू
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत) मो. ९८२३१९६३५९