विदेशी स्थलांतर रोखण्याचे आव्हान

भारतीय नागरिकत्व सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारणे, हे सधन होण्यासाठी आणि आपल्या कुटुंबांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी होत आहे. कारण तशा सुविधा आपल्याकडे मिळत नाहीत, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हे स्थलांतर रोखता येणार नाही. बेरोजगारीमुळे येणाऱ्या काळात ते जास्त वाढू शकते.

Story: संपादकीय |
10th March, 11:00 pm
विदेशी स्थलांतर रोखण्याचे आव्हान

भारतीय नागरिकत्व सोडून वेगवेगळ्या देशांचे नागरिकत्व स्वीकारणाऱ्या गोमंतकीयांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. नोकरीसाठी विदेशात जाणाऱ्या गोमंतकीयांचे भारतीय नागरिकत्व सोडण्याचे प्रमाण वर्षागणिक वाढत आहे. गेल्या पाच वर्षांतील आकडे पाहिले तर ८,४३५ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे. देशातील इतर काही राज्यांमध्येही याबाबतची आकडेवारी मोठी आहे. पण छोट्याशा गोव्यात भारतीय नागरिकत्व सोडून जाणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. कोविडच्या काळात २०२१ मध्ये ९९४ गोवेकरांनी भारतीय नागरिकत्व सोडले होते. कोविड ओसरू लागल्यानंतर २०२२ मध्ये १,२८५ जणांनी नागरिकत्व सोडले. २०२३ मध्ये २,०९४ तर २०२४ मध्ये २,२९५ गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्व सोडले. सोडलेले नागरिकत्व पुन्हा किती जणांनी मिळवले याची माहिती उपलब्ध असती, तर लोक नोकरीसाठी काही काळासाठी गोवा सोडून जात आहेत की कायमचे हे समजणे सोपे झाले असते. मात्र गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली तर पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारलेल्यांची संख्या जास्त आहे. तब्बल ८,३७० जणांनी पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारले आहे. ते नागरिकत्व घेतल्यानंतर युरोपीय देशांमध्ये काम किंवा शिक्षणासाठी जाता येते. लंडन, कॅनडा, जर्मनी, रशिया, थायलंड या देशांचे नागरिकत्व घेतलेल्यांची संख्या कमी आहे, पण देशाचे नागरिकत्व सोडणाऱ्यांचा जास्त ओढा हा पोर्तुगालच्या पासपोर्टकडे आहे. पोर्तुगीज राजवटीच्या वेळी गोव्यात जन्माला आलेल्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला पोर्तुगीज पासपोर्ट मिळण्याची मुभा असल्यामुळे चांगल्या जीवनशैलीसाठी हजारो गोमंतकीय आतापर्यंत पोर्तुगीज पासपोर्टच्या आधारे विदेशात स्थायिक झाले आहेत. गोव्यातील नोकऱ्यांमध्ये मोठी कमाई नसल्यामुळे तसेच येथे मर्यादित नोकऱ्या असल्यामुळे गोव्यातील विशेषतः सासष्टी, केपे, मुरगाव, तिसवाडी, बार्देशमधील अनेक गोमंतकीयांनी पोर्तुगीज पासपोर्ट स्वीकारला आहे. त्याशिवाय अन्य देशांमध्येही मोठ्या प्रमाणात लोक स्थायिक होत आहेत. गोव्यातील अनेकांना पोर्तुगीज नागरिकत्व मिळत असल्यामुळे गोव्यातील नागरिकांना दुहेरी नागरिकत्व मिळावे, अशी मागणीही अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र ही मागणी केंद्राने मान्य केलेली नाही. त्यामुळेच निवडणुकीच्या मतदार यादी पडताळणीत दुहेरी नागरिकत्व असलेल्यांचा गोव्यातील मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला. काहीजणांवर तर आता दुहेरी नागरिकत्वामुळे गुन्हे दाखल होत आहेत. मात्र गोव्यातील अनेक नागरिकांना पोर्तुगीज नागरिकत्व मिळत असल्यामुळे दुहेरी नागरिकत्व मिळावे, हा मुद्दा कोणीच गांभीर्याने घेत नाही. आमदार विजय सरदेसाई यांनीही विधानसभेत दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला, पण सरकारने ती मागणी स्वीकारलेली नाही. 

विदेशात स्थायिक होण्यामागे आणि भारतीय नागरिकत्व सोडून अन्य देशांचे नागरिकत्व घेण्यामागे अन्य काही कारणे आहेत ज्यात सुरक्षित जीवन पद्धती, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, चांगल्या साधन सुविधा, स्थिरता ही युरोपीयन देशांमध्ये जास्त चांगली असल्यामुळे पोर्तुगाल, आयरलँड, ऑस्ट्रिया अशा अनेक देशांत गोमंतकीय स्थायिक होत आहेत. गोव्यात अशा सुविधा नसल्यामुळे आणि नोकरीच्या चांगल्या संधी नसल्यामुळेच अनेक गोमंतकीय विदेशात कायमचे स्थायिक होत आहेत. दरम्यान, या गोष्टीचा सरकारवर काही परिणाम होत नसला तरी राजकीय व्यवस्थेत मात्र भाजपसारख्या पक्षाला याचा फायदाच होतो. कारण विदेशात स्थलांतरित होणारे हे बहुतांशी ख्रिस्ती धर्मातील असल्यामुळे ते काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे पारंपरिक मतदार असल्याचा भाजपचा समज आहे. त्यामुळे जे नागरिक स्थलांतरित होतात त्यांचा भाजपच्या मतांवर मोठा परिणाम होत नाही, त्यामुळेच हे स्थलांतर रोखण्यासाठीही कधी प्रयत्न होत नाहीत. हजारो गोमंतकीय नोकरीच्या शोधार्थ आणि चांगल्या राहणीमानासाठी युरोपीयन देशांसह लंडन, कॅनडा, अमेरिका, आखाती देशांचा विचार करतात. चांगल्या वेतनासाठी फक्त नोकरीसाठीच नव्हे, तर आता अनेकांचा कल विदेशात स्थलांतरित होण्याकडे आहे आणि गोव्यातून दरवर्षी वाढत चाललेले स्थलांतर हा त्याचा पुरावा आहे. पोर्तुगीज पासपोर्ट करून देणाऱ्या अनेक एजन्सी आज गोव्यात सक्रिय आहेत. त्यांच्याकडून चांगल्या सुविधा दिल्या जात असल्यामुळे त्यांना गोमंतकीयांकडून प्रतिसादही मोठा मिळतो. भारतीय नागरिकत्व सोडून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारणे, हे सधन होण्यासाठी आणि आपल्या कुटुंबांचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी होत आहे. कारण तशा सुविधा आपल्याकडे मिळत नाहीत, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. हे स्थलांतर रोखता येणार नाही. बेरोजगारीमुळे येणाऱ्या काळात ते जास्त वाढू शकते.