सरकारने या चांगल्या मोहिमेचा व्यापक प्रचार करावा. चाचण्यांसाठी महिला स्वतः पुढे येतील यासाठी जनजागृती होणे तितकेच गरजेचे आहे. शक्यतो सरकारी इस्पितळांमध्ये मोफत चाचण्यांसाठी सुविधांमध्ये वाढ करावी.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक योजना जाहीर केली. या योजनेद्वारे चाळीस वर्षांवरील महिलांची सरकारी इस्पितळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. ३१ मार्चपर्यंत सर्व सरकारी इस्पितळांमध्ये ११ प्रकारच्या आरोग्य चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. याच कालावधीत राज्यातील खासगी इस्पितळांमध्येही या चाचण्या सवलतीच्या दरात करता येतील. ८ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांनी ही योजना जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत म्हणजे, १० मार्चपर्यंत राज्यातील ६ हजार महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. ही योजना जाहीर झाल्यानंतर तीन दिवसांत एवढ्या मोठ्या संख्येने महिला चाचणीसाठी आल्या, याचाच अर्थ महिलांमध्ये आरोग्याच्या विषयावरून जागरूकता आहे. गोव्यातील अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे अनेकांना गोव्याबाहेर जावे लागते, असे याच ठिकाणी यापूर्वी तपशीलवार लिहिले आहे. कॅन्सरसारख्या आजारावरील उपचारांसाठी लोकांना गोव्याबाहेर जावे लागते आणि लाखो रुपये खर्च होतात. गोव्यातील आरोग्य क्षेत्रात इतक्या वर्षांत चांगल्या सुविधा निर्माण झाल्या नाहीत, त्यामुळे आरोग्य चाचण्यांकडेही अनेकांनी लक्ष दिले नाही. खासगी इस्पितळांकडून आरोग्य चाचण्यांच्या नावाखाली होणाऱ्या लुटीमुळे सर्वसामान्यांना या चाचण्या परवडत नाहीत. रक्ताच्या साध्या एक-दोन चाचण्या करायच्या झाल्यास, दीड-दोन हजार रुपये हमखास मोजावे लागतात. याच सुविधा सरकारने आपल्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत दिल्या तर त्याचा फायदा लोकांना होणार आहे. लोक आरोग्याच्या बाबतीत सतर्क आहेत, मात्र चाचण्या करायच्या झाल्यास सात-आठ हजार रुपये मोजावे लागतात, असा अनुभव असल्यामुळे आपणहून कोणी चाचण्या करण्यासाठी जात नाही.
यावेळी महिला दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चाळीस वर्षांवरील महिलांनी आरोग्य चाचण्या कराव्या यासाठी 'चेक्ड बाय दोतोर' ही मोहीम सुरू केली. महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे आणि मोफत चाचणी करून निरोगी आरोग्यासाठी खात्री करून घ्यावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला. यासाठी ११ विविध प्रकारच्या चाचण्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत सहा हजार महिलांनी आपल्या आरोग्याची चाचणी करून घेतली. महिलांकडून या चाचण्या करून घेतल्या जात असताना मुख्यमंत्र्यांनी एका विषयावर बोलताना विधानसभेत महत्त्वाचे विधान केले. गोव्यात डायलिसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आमदारांनी लोकांना समजावण्याचे आवाहन त्यांनी केले. डायलिसिस केंद्रांमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यापेक्षा डायलिसिसची वेळ येऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे त्यांचे म्हणणे आहे. गोव्यात आरोग्याची समस्या हा एक मोठा विषय झाला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांचा विळखा गोव्याला पडत आहे. कॅन्सर, मधुमेह, हृदयविकारासह अन्य अनेक प्रकारचे आजार बळावत चालले आहेत. डायलिसिसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता खरी गरज आहे ती लोकांना आरोग्याच्या चाचण्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याची. त्यांना चांगले निरोगी राहण्यासाठी सल्ले देण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने ठराविक वयोगटातील महिलांसाठी आरोग्य चाचण्या मोफत केल्या, त्याच पद्धतीने इतरांनाही अशा सुविधा देण्यावर भर द्यावा. सध्याच्या मोहिमेत चाळीस वर्षांवरील जास्तीत जास्त महिला आरोग्य तपासणी करून घेतील यासाठी आमदारांना, जिल्हा पंचायत सदस्यांना आणि पंचायत सदस्यांना जागृती करण्यास सांगावे. चाचण्यांच्या जास्त सुविधा उपलब्ध कराव्यात. शक्य असल्यास, अकरा प्रकारच्या चाचण्यांमध्ये काही महत्त्वाच्या आजारांबाबत होणाऱ्या चाचण्यांचा समावेश करावा.
आतापर्यंत ज्या सहा हजार महिलांनी चाचणी करून घेतली, त्यात मधुमेहासाठी ४,७३० जणांनी, स्तनाच्या कर्करोगासाठी २,४५६ आणि तोंडाच्या कर्करोगासाठी ३,२५७ चाचण्या करून घेतल्या आहेत. तसेच अॅनिमियासाठी ३,२२५ जणांच्या चाचण्या झाल्या. क्षयरोग आणि इतर महत्त्वाच्या चाचण्यांचाही यात समावेश आहे. सरकारने या चांगल्या मोहिमेचा व्यापक प्रचार करावा. चाचण्यांसाठी महिला स्वतः पुढे येतील यासाठी जनजागृती होणे तितकेच गरजेचे आहे. शक्यतो सरकारी इस्पितळांमध्ये मोफत चाचण्यांसाठी सुविधांमध्ये वाढ करावी. सर्वसामान्यांना खासगी रुग्णालयांच्या चाचण्यांचे दर परवडत नाहीत, त्यामुळे सर्वांना मोफत चाचण्या करता येतील, अशा प्रकारची व्यवस्था केली तर त्याचा फायदाच होईल.