
'जेव्हा रोम जळत होते तेव्हा निरो बासरी वाजवत होता!' हाच प्रसंग सुमारे १,९६२ वर्षांनंतर आज 'युनायटेड नेशन्स'च्या (संयुक्त राष्ट्रसंघ) बाबतीत घडत आहे. जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय संघटना आज केवळ 'कागदी वाघ' ठरत आहेत का, असा संतप्त सवाल संपूर्ण जग विचारत आहे. पहिल्या महायुद्धानंतर 'लीग ऑफ नेशन्स' अपयशी ठरली आणि त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या राखेतून संयुक्त राष्ट्रसंघाचा जन्म झाला. 'पुन्हा युद्ध होऊ देणार नाही' अशी शपथ घेऊन अस्तित्वात आलेल्या या संघटनेची अवस्था आज अत्यंत बिकट झाली आहे. विशेषतः पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे 'युएन'च्या हतबलतेचे प्रदर्शन पुन्हा एकदा जगासमोर मांडले गेले आहे.
इस्रायलच्या 'ऑपरेशन लायन्स रोअर' आणि अमेरिकेची 'एपिक फ्युरी' या लष्करी मोहिमांमुळे आखाती देश युद्धज्वाळांनी वेढले गेले आहेत. २८ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते मारले गेले. दक्षिण इराणमधील मुलींच्या शाळेवर झालेल्या इस्रायली हल्ल्यात १५० निष्पाप जीवांचा बळी गेला; ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. आतापर्यंत या युद्धात इराणमधील १० हजार नागरी ठिकाणांवर अमेरिका-इस्रायलचा बॉम्बमारा झाला आहे. गेल्या ११ दिवसांत १३०० हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस केवळ 'हल्ले थांबवा' किंवा 'शांतता राखा' असे आवाहन करणारी पत्रके प्रसिद्ध करत आहेत. मात्र, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांच्या आवाजात हे शांततेचे आवाहन हवेत विरून जात असल्याचे दिसत आहे.
'युएन'च्या या अपयशाचे मूळ त्याच्या संरचनेतच आहे. सुरक्षा परिषदेतील अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स या पाच कायमस्वरूपी सदस्यांकडे असलेला 'व्हीटो' (नकाराधिकार) अधिकार लोकशाहीच्या नावाखाली दंडेलशाही गाजवणारा ठरला आहे. यातील कोणत्याही एका देशाने विरोध दर्शवला, तर 'युएन' लष्करी हस्तक्षेप करू शकत नाही. स्वतःची कायमस्वरूपी फौज नसणे आणि अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असणे, यामुळे ही संघटना केवळ एक 'चर्चा मंडळ' बनून राहिली आहे. इराक, गाझा, युक्रेन आणि आता पश्चिम आशियातील हा भडका 'युएन'च्या अपयशाच्या प्रदीर्घ यादीतील नवीन प्रकरणे आहेत. जेव्हा जगाला खऱ्या अर्थाने संरक्षणाची गरज असते, तेव्हा या 'दात नसलेल्या' जागतिक संघटना केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसतात, हे दुर्दैव आहे.
- ऋषभ एकावडे