इराणची लष्करी क्षमता झाली कमकुवत

Story: विश्वरंग |
13th March, 09:43 pm
इराणची लष्करी क्षमता झाली कमकुवत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध सुरू असलेल्या युद्धाबाबत मोठा दावा करत हे युद्ध लवकरच संपुष्टात येऊ शकते, असे म्हटले आहे. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, इराणमध्ये आता लक्ष्य करण्यासारखे जवळजवळ काहीच उरलेले नाही, त्यामुळे संघर्ष लवकर संपण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन व सहयोगी सैन्यांच्या सलग हल्ल्यांमुळे इराणच्या अनेक लष्करी क्षमतांना मोठा फटका बसला आहे. मी जेव्हा इच्छितो तेव्हा हे युद्ध संपवू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी सांगितले की, अलीकडील मोहिमांमध्ये इराणमधील अनेक महत्त्वाच्या लष्करी तळांवर, क्षेपणास्त्र प्रक्षेपण यंत्रणांवर आणि संरक्षणात्मक पायाभूत सुविधांवर हल्ले करण्यात आले. या कारवाईमुळे इराणची लष्करी क्षमता मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, अमेरिकेने आणि सहयोगी देशांनी प्रमुख लष्करी उद्दिष्टे मोठ्या प्रमाणात साध्य केली आहेत, त्यामुळे युद्धाचा शेवट जवळ येऊ शकतो. मात्र तज्ज्ञांचे मत आहे की, मध्यपूर्वेतील परिस्थिती अद्याप तणावपूर्ण आहे आणि पूर्ण शांतता प्रस्थापित होण्यासाठी वेळ लागू शकतो.

या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि इराण यांच्यात क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरूच आहेत. खाडी परिसरातील अनेक देशांमध्येही सुरक्षा कडक करण्यात आली आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी यापूर्वी म्हटले होते की, हे युद्ध किती काळ चालेल याचा अंतिम निर्णय ट्रम्प यांच्यावर अवलंबून आहे. युद्धाची सुरुवात, मध्य किंवा शेवट कधी होईल हे ट्रम्प ठरवतील, असेही त्यांनी सांगितले होते.

रिपब्लिकन नेत्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत बोलताना ट्रम्प यांनी या संघर्षाला ‘शॉर्ट-टर्म एक्सकर्शन’ असे संबोधले होते. त्यांनी सांगितले की हे युद्ध लवकर संपेल, परंतु आपण अजून पूर्ण विजय मिळवलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, तणाव वाढवणाऱ्या आणखी एका घटनेत इराणने पलटवार करत होर्मुझची सामुद्रधुनीजवळ तीन जहाजांवर अज्ञात प्रोजेक्टाइलने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी अमेरिकन सैन्याने या भागात इराणची माइन टाकणारी जहाजे नष्ट केल्याचा दावा केला होता. तेहरानने या महत्त्वाच्या समुद्री मार्गात माइन टाकण्यास सुरुवात केली आहे, अशी चर्चा आहे.

इस्रायलने तेहरानमधील लक्ष्यांवर आणखी एका हल्ल्याची लाट सुरू केल्याचे सांगितले. राजधानी तेहरानच्या बाहेरील उत्तर भागात जवळपास एका तासापर्यंत हवाई हल्ले झाल्याची माहिती मिळाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघातील इराणच्या राजदूतांनी सांगितले की, संघर्ष सुरू झाल्यापासून इराणमध्ये १,३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

- सुदेश दळवी