समुपदेशनामधील गोपनीयता म्हणजे सगळं कायमचं बंद करून ठेवलेलं गुपित नाही. ती एक जबाबदारी असते, विश्वास जपण्याची आणि वैयक्तिक सुरक्षिततेचीही काळजी घेण्याची.

डाॅक्टर, मी जे सांगणार आहे ते कुणालाही कळणार नाही ना?”
समुपदेशनाच्या पहिल्या भेटीत मला हा प्रश्न इतक्या वेळा ऐकायला मिळतो नं की कधी कधी वाटतं, माझ्या टेबलावर पाण्याच्या बाटलीसोबत ‘हो, येथे गोपनीयता राखली जाईल’ असा बोर्डच ठेवावा जणू!
पण खरं सांगायचं तर हा प्रश्न अगदीच रास्त आहे. कारण आपल्या समाजात मन मोकळं करणं हेच खरंतर फार मोठं धाडस असतं. घरात सांगितलं तर गैरसमज होण्याची भीती, मित्रांना सांगितलं तर गॉसिप होण्याची शक्यता... आणि म्हणून शेवटी लोक आमच्याकडे येतात, थोडं मन हलकं करण्यासाठी.
अगदी याचसाठी, कुठल्याही प्रकारच्या समुपदेशनात, गोपनीयता (confidentiality) हा फक्त नियम नसतो, तर तो परस्परांतील विश्वासाचा पाया असतो.
समुपदेशनातील गोपनीयता म्हणजे नक्की काय?
क्लायंटने सांगितलेली वैयक्तिक माहिती समुपदेशकाने इतरांशी सहजासहजी शेअर न करणे. एखादा व्यक्ती आपल्या आयुष्यातले गुंतागुंतीचे अनुभव, नात्यांमधले ताण, भीती, अपराधीपणा किंवा असुरक्षितता सांगत असतो. अशा वेळी त्याला सुरक्षित वाटणं फार महत्त्वाचं असतं.
म्हणुनच समुपदेशकाची केबिन म्हणजे न्यायनिवाडा करणारी कोर्टरूम नसते. तर ती एक सुरक्षित जागा असते. इथे सांगितलेलं ऐकलं जातं, समजून घेतलं जातं आणि जपून ही ठेवलं जातं.
परंतु ही गोपनीयता अमर्याद नसते, आणि ती क्लायंटच्या वयावरही काही प्रमाणात अवलंबून असते. कशी?
प्रौढ (Adults) क्लायंट्ससाठी, गोपनीयता सर्वाधिक मजबूत असते. ते स्वतःच्या निर्णयाने समुपदेशन घेत असल्याने त्यांच्या माहितीचा अधिकारही त्यांच्याकडेच असतो. त्यांच्या परवानगीशिवाय माहिती शेअर केली जात नाही जोपर्यंत स्वतःला किंवा इतरांना गंभीर धोका निर्माण होत नाही.
किशोरवयीन (Adolescents) क्लायंट्सच्या बाबतीत थोडी संवेदनशील समतोल साधावा लागतो. पालकांचा सहभाग असतो, पण तरीही मुलाला सुरक्षित आणि मोकळं वाटणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे समुपदेशक साधारणपणे मुलाने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा तपशील पालकांना सांगत नाही. मात्र जर स्वतःला इजा करण्याचा विचार, व्यसन, हिंसा किंवा गंभीर धोका असेल तर पालकांना माहिती देणं आवश्यक ठरू शकतं.
लहान मुलांच्या बाबतीत (Minors) गोपनीयतेचे नियम अधिक वेगळे असतात. कारण कायदेशीरदृष्ट्या त्यांच्या निर्णयांची जबाबदारी पालक किंवा पालकप्रतिनिधींवर असते. त्यामुळे समुपदेशन प्रक्रियेत पालकांचा सहभाग असतो. तरीही मुलाला विश्वास वाटावा म्हणून समुपदेशक त्याच्या भावनांचा आदर करतो आणि प्रत्येक छोट्या गोष्टीची चौकशी पालकांसमोर करत नाही.
पण इथे मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छिते की जर मुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, जसे की अत्याचार, स्वतःला इजा करण्याचे विचार किंवा गंभीर धोका, तर ती माहिती योग्य व्यक्ती किंवा संस्थेला देणं ही त्या समुपदेशकाची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी असते.
म्हणूनच समुपदेशन सुरू होण्यापूर्वी अनेक ठिकाणी informed consent दिलं जातं. त्यात क्लायंटला आणि गरज असल्यास पालकांना स्पष्ट सांगितलं जातं की कोणती माहिती गोपनीय राहील आणि कोणत्या परिस्थितीत ती शेअर करावी लागू शकते. ही पारदर्शकता विश्वास वाढवते.
समुपदेशन आणि मानसोपचाराच्या कामात एक वेगळीच जबाबदारी असते. अनेकदा लोक त्यांच्या आयुष्यातल्या अत्यंत वैयक्तिक, कधी कधी वेदनादायक गोष्टी सांगतात. त्या गोष्टी समुपदेशकासाठी “कुतूहलाची माहिती” नसते! उलट, त्या विश्वासाने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी असते.
म्हणून त्या माहितीचा उपयोग फक्त क्लायंटच्या भल्यासाठी आणि व्यावसायिक मर्यादेतच केला जातो.
लक्षात घ्या, समुपदेशनामधील गोपनीयता म्हणजे सगळं कायमचं बंद करून ठेवलेलं गुपित नाही. ती एक जबाबदारी असते, विश्वास जपण्याची आणि वैयक्तिक सुरक्षिततेचीही काळजी घेण्याची. जेव्हा एखाद्या व्यक्तीला खात्री वाटते की त्याच्या भावनांचा आदर केला जाईल, त्याचं बोलणं संवेदनशीलतेने ऐकलं जाईल आणि योग्य त्या मर्यादेतच हाताळलं जाईल, तेव्हा तो मन खर्या अर्थाने उघडायला धजावतो.
आणि समुपदेशनाची खरी प्रक्रिया कदाचित तिथूनच सुरू होते..
जिथे गुपितांपेक्षा विश्वास अधिक महत्त्वाचा ठरतो.

- मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक
डिचोली - गोवा
७८२१९३४८९४