लोअर बेली फॅट ही केवळ दिसण्याशी संबंधित समस्या नसून ती शरीरातील बदल, जीवनशैली आणि विशेषतः प्रसूतीनंतर होणाऱ्या शारीरिक बदलांशी संबंधित असते.

सकाळची वेळ होती. ऑफिसला जायची घाई, मुलांच्या शाळेची तयारी आणि घरातील कामांची लगबग; सगळे नेहमीप्रमाणे सुरू होते. आरशापुढून जात असताना ऋतुजाच्या नजरेस पुन्हा एकदा पोटाखालच्या भागात वाढलेली चरबी दिसली. “मी फार जाडही नाही, तरीही हा लोअर बेली फॅट का कमी होत नाही?” असा प्रश्न तिच्या मनात आला. व्यायाम अधेमधे करते, आहारही फार चुकीचा नाही; तरीही हा हट्टी चरबीचा थर काही केल्या कमी होत नव्हता.
प्रसूती होऊन बरीच वर्षे उलटली होती. पण प्रसूतीनंतर शरीरात झालेले बदल, झोपेची कमतरता आणि व्यायामासाठी पुरेसा वेळ न मिळणे या सगळ्याचा परिणाम तिच्या शरीरावर नकळत दिसू लागला होता. ऋतुजासारख्या मध्यम वयातील अनेक महिलांमध्ये पोटाच्या खालच्या भागात चरबी साठण्याची समस्या सुरू होताना आपल्याला दिसते. वेळीच उपाय योजना न केल्यास वयाच्या उशिरा पर्यंत ती तशीच राहते व पाठदुखी- कंबरेच्या त्रासांचे कारण बनू शकते. त्यामुळे या समस्येमागील कारणे समजून घेणे आणि योग्य उपाय करणे महत्त्वाचे आहे.
अनेक महिलांचे वजन सामान्य असते, तरीही पोटाच्या खालच्या भागात चरबी दिसते. यामुळे शरीराची ठेवण बदलते तसेच आत्मविश्वासावरही परिणाम होऊ शकतो. यामागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात.
१. हार्मोनल बदल
महिलांच्या शरीरात वेळोवेळी हार्मोनल बदल होत असतात. मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूतीनंतरचा काळ किंवा रजोनिवृत्तीच्या आसपास शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बदलू शकते. या बदलांमुळे शरीरात विशेषतः पोटाच्या खालच्या भागात चरबी साठण्याची शक्यता वाढते.
२. प्रसूतीनंतर शरीरात होणारे बदल
प्रसूतीनंतर अनेक महिलांना पोट सैल झाल्यासारखे वाटते किंवा खालच्या भागात चरबी साठल्यासारखी दिसते. गर्भधारणेदरम्यान पोटाचे स्नायू आणि त्वचा ताणली जाते. प्रसूतीनंतर काही काळ हे स्नायू कमजोर राहू शकतात. त्यातच नवजात बाळाची काळजी, झोपेची कमतरता आणि नियमित व्यायामासाठी वेळ न मिळणे यामुळे पोटाचे स्नायू तशेच कमजोर राहिल्यामुळे लोअर बेली फॅट वाढण्याची शक्यता असते.
३. डायस्टेसिस रेक्टाय
गर्भधारणेदरम्यान पोटाच्या मधल्या भागातील रेक्टस अब्डोमिनिस स्नायूंमध्ये अंतर तयार होऊ शकते, ज्याला डायस्टेसिस रेक्टाय असे म्हणतात. या अंतरामुळे पोटाचे स्नायू कमकुवत होतात आणि पोट पुढे आलेले दिसू शकते. अनेक महिलांना प्रसूतीनंतरही हे अंतर राहते, त्यामुळे लोअर बेली फॅट अधिक स्पष्ट दिसू शकते.
४. सिझेरियन प्रसूतीनंतरचा ‘पाउच’
सिझेरियन प्रसूती झालेल्या महिलांमध्ये पोटाच्या स्नायूंना पूर्णपणे बळकटी मिळण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. शस्त्रक्रियेनंतर काही काळ हालचाल कमी होते आणि व्यायाम उशिरा सुरू होतो. त्यामुळे पोटाच्या खालच्या भागात चरबी साठण्याची शक्यता वाढू शकते.
५. बसून राहण्याची जीवनशैली
आजकाल अनेक महिला दीर्घकाळ संगणकावर काम करतात किंवा कमी हालचाल असलेली जीवनशैली जगतात. सतत बसून राहिल्यामुळे शरीरातील कॅलरी खर्च कमी होतो आणि अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात साठू लागते.
६. चुकीच्या आहाराच्या सवयी
जास्त प्रमाणात साखर, मैद्याचे पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न आणि अनियमित वेळेत जेवण घेणे यामुळे शरीरात चरबी साठण्याची शक्यता वाढते.
७. ताणतणाव आणि अपुरी झोप
सततचा मानसिक ताण आणि अपुरी झोप यामुळे शरीरातील काही हार्मोन्सचे प्रमाण बदलते. यामुळे भूक वाढू शकते तसेच शरीरात चरबी साठण्याची प्रक्रिया वेगाने होऊ शकते.
लोअर बेली फॅट वाढल्याने शरीरातील अनेक समस्या वाढू शकतात. पोटाभोवती साचलेली चरबी इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवू शकते. त्यामुळे पाळी अनियमित होणे, पीसीओएस ची लक्षणे वाढणे, वजन वाढण्याची शक्यता वाढणे अशा समस्या दिसू शकतात. लोअर बेली वाढल्याने शरीराचे पोश्चर बदलते. त्यामुळे कंबरदुखी, मणक्यांचे त्रास, पाठीच्या खालच्या भागात ताण, दीर्घकाळ बसल्यावर किंवा उभे राहिल्यावर त्रास जाणवू शकतो. पोटाभोवती वाढलेली चरबी ही वीसरल फॅटशी संबंधित असू शकते, ज्यामुळे टाईप २ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कोलेस्टेरॉल वाढणे या मेटाबॉलिक आजारांचा धोका वाढतो. पोटावर जास्त चरबी असल्यास काही महिलांना अॅसिडिटी, पोट फुगणे, जडपणा यासारख्या पचनसंस्थेच्या तक्रारी तक्रारी जाणवू शकतात. लोअर बेली फॅटमुळे काही महिलांना आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो. शरीराविषयी असमाधान, कपडे घालताना अस्वस्थता, आत्मविश्वास कमी होणे असा मानसिक परिणामही होऊ शकतो.
लोअर बेली फॅट कमी करण्यासाठी उपाय
१. नियमित व्यायाम करणे : दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग किंवा हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरते.
२. प्रसूतीनंतर योग्य कोर व्यायाम : डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने पोटाचे स्नायू मजबूत करणारे व्यायाम करावेत. विशेषतः डायस्टेसिस रेक्टाय असल्यास योग्य सल्ला घेऊन व्यायाम करणे आवश्यक आहे.
३. संतुलित आहार : प्रथिने, भाज्या, फळे आणि तंतुमय पदार्थांचा समावेश असलेला आहार घ्यावा.
४. पुरेशी झोप : दररोज ७–८ तासांची झोप शरीराच्या आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
५. नियमित हालचाल ठेवणे : दीर्घकाळ बसून राहण्याऐवजी दर काही वेळाने उठून थोडे चालणे आवश्यक आहे.
लोअर बेली फॅट ही केवळ दिसण्याशी संबंधित समस्या नसून ती शरीरातील बदल, जीवनशैली आणि विशेषतः प्रसूतीनंतर होणाऱ्या शारीरिक बदलांशी संबंधित असते. डायस्टेसिस रेक्टाय, सिझेरियन प्रसूती, हार्मोनल बदल आणि कमी हालचाल यामुळे ही समस्या वाढू शकते. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने केलेले कोअर स्ट्रेंथनिंग यामुळे ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी करता येते. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आणि योग्य वेळी काळजी घेणे हे निरोगी आयुष्याचे महत्त्वाचे पाऊल आहे.

डॉ. श्वेता राऊत मुळगावकर