
महिला दिन आला की अनेक संदेश, विचार आणि शुभेच्छा ऐकायला मिळतात.
स्त्रीची ताकद, तिचं सामर्थ्य, तिची कर्तृत्वगाथा... खूप काही बोललं जातं.
पण एक महिला म्हणून मनात नेमकं काय चाललेलं असतं, हे कदाचित फार कमी जण विचारतात.
आयुष्यात खूप काही करायचं असतं, खूप स्वप्नं असतात...
पण वेळ आणि जबाबदाऱ्या यांच्या गर्दीत ती स्वप्नं कधी मागे पडतात ते कळतही नाही.
एक मुलगी म्हणून आई-पप्पांसाठी काहीतरी करावंसं वाटतं,
बहीण म्हणून नातं जपायचं असतं,
बायको म्हणून जबाबदाऱ्या निभवायच्या असतात,
सून म्हणून अपेक्षा पूर्ण करायच्या असतात,
आई म्हणून मुलांसाठी सर्वस्व द्यायचं असतं,
आणि कामावर एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर आदर्श उभा करायचा असतो.
ही सगळी नाती जपत असताना कधी कधी मन थकून जातं...
आणि एक खंत मनात राहते –
की कुठल्याच नात्याला आपण पूर्ण १००% देऊ शकत नाही.
सगळ्यात जास्त खंत कशाची वाटते माहीत आहे?
स्वतःसाठीसुद्धा १००% वेळ देता येत नाही.
मग कधी कधी मन चिडचिडतं...
काय करावं, कसं करावं, काहीच समजत नाही.
आणि नकळत मनात एक प्रश्न येतो,
या सगळ्यात आपण योग्य तर आहोत ना?
पण कदाचित हाच स्त्रीचा खरा प्रवास असावा...
स्वतःच्या इच्छा थोड्या बाजूला ठेवूनही,
सगळ्यांसाठी उभी राहण्याचा.
थकूनही पुन्हा उभं राहण्याचा.
आणि नात्यांना जपत जपत आयुष्य पुढे नेत राहण्याचा.

- सृष्टी नेरुरकर
मडगांव