यज्ञश्रेष्ठ जो जपयज्ञ तो मीच !

देवांचा पुरोहित जो बृहस्पती तोच मी. सेनापतींमध्ये मी स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी होय आणि सगळ्या जलाशयांमध्ये मी समुद्र आहे, असे तू समज. तसेच महर्षींमध्ये भृगू महर्षी, वचनांमध्ये एक अक्षर म्हणजे ओंकार, सर्वप्रकारच्या यज्ञांमध्ये मी जपयज्ञ व स्थिर राहणाऱ्यांमध्ये मी हिमालय आहे

Story: विचारचक्र |
15th March, 09:36 pm
यज्ञश्रेष्ठ जो जपयज्ञ तो मीच !

श्री हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतय:।

प्राधान्यत: कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ।।१९।।

सरळ अर्थ : अर्जुनाने विचारल्यावर श्रीकृष्ण भगवान म्हणाले, हे कुरुश्रेष्ठा, आता मी तुला आपल्या दिव्य विभूती मुख्य मुख्य अशा कथन करीन कारण माझ्या विस्ताराचा अंत नाही.

विस्तृत विवेचन : प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा जनक असूनही आपला प्रताप विस्ताराने न आठवल्याने तो श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की, बाबा आज तू मला भक्तिभावाने बोलते केलेस ते चांगले केलेस. श्रीकृष्ण असे म्हणाले म्हणून नवल वाटण्याचे तसे काही कारण नाही. कारण स्वतः कितीही जगद्गुरू असला तरी तो शेवटी नंद-यशोदेचा मुलगाच ना? ते म्हणाले की, तू विचारलेल्या माझ्या विभूती मी आता तुला सांगतो. त्या असंख्य असल्याने माझ्या मलाच मोजता येत नाहीत. रोम-रंध्रे म्हणजे शरीरावरील केसांच्या मुळाशी असलेली छिद्रे किती असतात ते आपले आपल्याला मोजता येते का? तसा माझा विभूती-विस्तार अपार असल्याने तो नेमका किती आहे ते सांगणे कठीण आहे. एरवीसुद्धा मी कसा आणि केवढा आहे याचे माझे मलाच आकलन होत नाही. तरीही त्यातल्या त्यात ज्या ज्या मुख्य मुख्य व विख्यात म्हणून आहेत त्या त्या सांगतो.

जसे मुठीत बीज गावले की सगळे वृक्षत्व हातात येते तसे या मुख्य विभूतींचे ज्ञान झाले की माझ्या बाकी विस्ताराचीही कल्पना तुला येईल. नाही तरी आख्खी बाग ताब्यात आली की त्यातल्या फळा-फुलांची प्राप्ती जशी सहजच होते, त्या प्रकारे या विभूती जाणल्यावर तुला सकल विश्वाची कल्पना येईल. एऱ्हवी अखंड आकाश-अवकाशही माझ्या विस्ताराचाच एक भाग होय.

अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः ।

अहमादिश्च मध्यं च भूतानामन्त एव च ।।२०।।

सरळ अर्थ : हे अर्जुना, मी सर्व भूतांच्या हृदयात असलेला सर्वांचा आत्मा आहे; तसेच सर्व भूतांचा आदी, मध्य व अंत ही मीच आहे.

विस्तृत विवेचन : श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत, हे गुडाकेशा, तुझ्या डोक्यावरील हे कुरळे केस चांगले शोभत आहेत! धनुर्विद्येत तर तू प्रत्यक्ष त्रिलोचन शंकरासारखा प्रवीण आहेस. रूपवान व धैर्यवान असा नरवीर तूच आहेस. आता माझा विभूती विस्तार ऐक.

सगळ्या प्राणिमात्रांमध्ये एकच आत्मा म्हणून जो विद्यमान आहे तो मीच आहे, हे तू नि:शंकपणे जाण. सगळ्या जीवांना आदी, अंती आणि मध्येही सदासर्वकाळ जो व्यापून राहतो तोही मीच आहे.

ढगांच्या बाबतीत खाली वर आणि अंतर्बाह्य जसे एकच एक आकाश असते, आणि जेव्हा ते ढग विरून जातात तेव्हा ते जसे आकाशातच लय पावतात, तसाच सगळ्या प्राण्यांच्या समुदायांच्या बाबतीत ते अस्तित्वात यायच्या आधी माझ्यातच असतात, त्यांचे अस्तित्व माझ्यातच विद्यमान असते व त्यांचा अंत झाल्यावरही ते माझ्यातच विरून जातात. विभूती-योगाने माझा व्यापक विस्तार तो हाच होय हे तू समजून घे. त्या व्यतिरिक्त हे धनंजया, ज्या विशेष विभूती जाणून घेणे तुला आवश्यक आहे त्याही तुला सांगतो ते लक्षपूर्वक ऐक.

आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषां रविरंशुमान् ।

मरीचिर्मरुतामस्मि नक्षत्राणामहं शशी ।।२१।।

सरळ अर्थ : मी अदितीच्या बारा पुत्रांपैकी विष्णू अर्थात् वामन अवतार आणि ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य आहे. तसेच मी एकोणपन्नास वायु देवतांमध्ये मरीची नावाची वायुदेवता व नक्षत्रात नक्षत्रांचा अधिपति चंद्रमा आहे.

विस्तृत विवेचन : असे म्हणून मग तो कृपावंत म्हणाला की आदित्यांमध्ये जो विष्णू, तो मी आहे. (आदित्य म्हणजे अदितीचे पुत्र. देव. बारा आदित्य, देवता. धातृ, मित्र, अर्यमा, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विवस्वत, पूषन्, सवितृ, त्वष्टृ व विष्णू ही बारा महिन्यांतील सूर्याची बारा रुपे आहेत.)

सगळ्या तेजस्व्यांमध्ये रश्मिवंत रवी मीच आहे. तसाच मरुत्ससमूहात मरीची मी आहे. (मरुत्ससमूह हा एक देवतावर्ग आहे. यात ४९ देवता आहेत. आकाशात जी नक्षत्र दिसतात त्यांच्यामधला सगळ्यात मोठा जो चंद्र, तोही मीच आहे.

वेदानां सामवेदोsस्मि देवानामस्मि वासव: ।

इंद्रियाणां मनश्चास्मि भूतानामस्मि चेतना ।।२२।।

सरळ अर्थ : वेदांमध्ये मी सामवेद आहे, देवांमध्ये मी इंद्र आहे, इंद्रियांमध्ये मी मन आहे आणि भूतप्राण्यांमध्ये चेतनता अर्थात ज्ञानशक्ती मीच आहे.

विस्तृत विवेचन : तसेच हे कुंती-सुता, मी देवांमधला मरुद्बंधु इंद्र आहे, वेदांमधला सामवेद, इंद्रियांमधले आकरावं इंद्रिय जे मन ते मन मीच आहे व समस्त प्राणिमात्रांमधील जी का स्वाभाविक चेतना, तीही मीच आहे.

रुद्राणां शंकरश्चास्मि वित्तेशो यक्षरक्षसाम् ।

वसूनां पावकश्चास्मि मेरु: शिखरिणामहं ।।२३।।

अर्थ : अकरा रुद्रांमध्ये मदनारि शंकर मी आहे, यक्ष व राक्षस यांच्यामध्ये धनपती शंभु-सखा कुबेर मी आहे, आठ वसूंपैकी अग्नी मी आहे आणि शिखर असणाऱ्या पर्वतांमध्ये सुमेरू पर्वत मी आहे.

पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।

सेनानीनामहं स्कंद: सरसामस्मि सागर: ।।२४।।

महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।

यज्ञानां जपयज्ञोsस्मि स्थावराणां हिमालय: ।।२५।।

अर्थ : पुरोहितांमध्ये मुख्य अर्थात देवांचा पुरोहित जो बृहस्पती तोच मी, सेनापतींमध्ये मी स्कंद म्हणजे कार्तिकस्वामी होय आणि सगळ्या जलाशयांमध्ये मी समुद्र आहे, असे तू समज. तसेच महर्षींमध्ये भृगू महर्षी, वचनांमध्ये एक अक्षर म्हणजे ओंकार, सर्वप्रकारच्या यज्ञांमध्ये मी जपयज्ञ व स्थिर राहणाऱ्यांमध्ये मी हिमालय आहे.


- मिलिंद कारखानीस

(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)

मो. ९४२३८८९७६३