
‘जल-जीवन-हरियाली अभियान’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे बिहारमध्ये पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने मोठा सकारात्मक बदल घडून आला आहे. सुमारे सात वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या अभियानामुळे राज्यातील हरित क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही त्याचा फायदा होत आहे. बिहारमधील हरित आच्छादन १५.५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.
ग्रामीण विकास विभागामार्फत २०१९ पासून या अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यभर मोठ्या प्रमाणावर रोपवाटिका उभारून तसेच सघन वृक्षारोपण करून हरित क्षेत्र वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत राज्यात तब्बल २१ कोटी २४ लाख ९७ हजार ३६६ झाडे लावण्यात आली आहेत.
वित्तीय वर्षनिहाय वृक्षारोपणाची आकडेवारी पाहिली असता या मोहिमेची व्याप्ती स्पष्ट होते. २०२४-२५ या वर्षात सर्वाधिक ४ कोटी ६ लाख १ हजार ६३१ झाडे लावण्यात आली. २०२५-२६ मध्ये ३ कोटी ३७ लाख ९३ हजार ९९७, २०२३-२४ मध्ये ३ कोटी ३१ लाख ८ हजार ३६२, तर २०२२-२३ मध्ये २ कोटी ७२ लाख ४१ हजार ८९ झाडे लावली गेली. यापूर्वी २०२१-२२ मध्ये ३ कोटी ३१ लाख ८ हजार ९०४ आणि २०२०-२१ मध्ये ३ कोटी २६ लाख १९ हजार ६७८ झाडे लावण्यात आली होती. अभियानाच्या सुरुवातीच्या टप्प्यात २०१९-२० मध्ये १ कोटी ४८ लाख १३ हजार ७०५ झाडांचे रोपण करण्यात आले होते.
गेल्या सात वर्षांत राबवण्यात आलेल्या या व्यापक वृक्षारोपण मोहिमेमुळे राज्यातील हरित क्षेत्राचा विस्तार झपाट्याने झाला आहे. सध्या हरित आच्छादन १५.५ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून २०२८ पर्यंत ते १७ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट आहे.
या अभियानाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम झाला आहे. फळझाडांची लागवड वाढल्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. तसेच स्वयंसहाय्यता गट आणि जीविका दीदींना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या आहेत. रोपवाटिकांमध्ये शोभेची तसेच फळझाडांची रोपे तयार करून महिला गटांच्या सदस्यांना दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
रस्त्यांच्या कडेला, कालव्यांच्या परिसरात, सार्वजनिक ठिकाणी, शाळांच्या आवारात, सरकारी कार्यालयांमध्ये आणि ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. याबाबत ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार यांनी सांगितले की, हवामान बदल ही जागतिक स्तरावरील गंभीर समस्या बनली आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण अत्यंत आवश्यक असून जल-जीवन-हरियाली अभियानाद्वारे पर्यावरण संरक्षण आणि हवामान संतुलन राखण्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.
- प्रसन्ना कोचरेकर