सामरिक राजकारणावर भारताची हुकूमत

Story: प्रासंगिक |
18th March, 10:25 pm
सामरिक राजकारणावर भारताची हुकूमत

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात उद्भवलेल्या भीषण युद्धामुळे सध्या संपूर्ण आशिया आणि आखाती प्रदेशात अनिश्चिततेचे दाट सावट आहे. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांच्या वर्षावामुळे जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा बाजाराचा डोलारा कोलमडलेला असताना, भारताने मात्र जागतिक राजकारणाच्या या बुद्धिबळाच्या पटावर अत्यंत प्रगल्भ आणि धोरणात्मक चाली रचत स्वतःला सुरक्षित ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 'चेकमेट'च्या स्थितीतही भारताचे राष्ट्रीय आणि आर्थिक हितसंबंध ज्या प्रभावीपणे जपले आहेत, त्याची दखल आज संपूर्ण जगाला घ्यावी लागत आहे.

आज शेजारील व्हिएतनाम, बांगलादेश आणि पाकिस्तानसारखे देश इंधन टंचाईच्या 'कोंडीत' सापडले असून तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अनेक राष्ट्रे या संकटातून सावरण्यासाठी भारताकडे आशेने पाहत असताना, भारतीय बाजारपेठेत मात्र कमालीची स्थिरता दिसून येत आहे. इराणने पुकारलेल्या सागरी नाकाबंदीचा 'पेच' सोडवत, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करणे आणि अमेरिकेच्या निर्बंधांच्या 'चाली' धुडकावत रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करणे, हे भारतीय विदेश नीतीचे मोठे यश मानले जात आहे.

ट्रम्प प्रशासनाने रशियन तेल खरेदीवरून भारतावर दंडात्मक शुल्काचा 'वार' केला, परंतु पंतप्रधान मोदींनी त्याला आक्रमक प्रतिउत्तराऐवजी 'पॅसिव्ह डिप्लोमसी'ची एक संयत 'चाल' रचून चोख उत्तर दिले. अमेरिकेवर थेट टीका न करता, त्यांनी स्वदेशीचा नारा देत आपली बाजू भक्कम केली. परिणामी, अमेरिकेला नमते घ्यावे लागले आणि भारताला व्यापारात मोठी सवलत मिळाली. ट्रम्प प्रशासनाकडून भारताचा झालेला विशेष उल्लेख हा भारतीय मुत्सद्देगिरीचा 'मॅजिक टच' असल्याचे सिद्ध झाले आहे.

केवळ व्यापारच नव्हे, तर लष्करी पातळीवरही भारताने 'सर्वांशी मैत्री' हे सूत्र एखाद्या कसबी खेळाडूसारखे वापरले. इस्रायल आणि इराण या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांशी एकाच वेळी नाते टिकवून ठेवण्याचे 'बॅलन्सिंग' भारताने उत्तम साधले. अमेरिकेच्या हल्ल्यात जखमी झालेल्या इराणी खलाशांना कोचीमध्ये आश्रय देऊन भारताने जागतिक राजकारणात मानवतेचा 'मोहरा' पुढे केला. पंतप्रधान मोदींनी १२ मार्च २०२६ रोजी इराणच्या अध्यक्षांशी साधलेला संवाद हा या खेळातील निर्णायक क्षण ठरला. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची सूक्ष्म रणनीती आणि पंतप्रधानांचा 'पर्सनल टच' यामुळे भारताची ही 'सायलेंट डिप्लोमसी' आज खऱ्या अर्थाने जगासाठी दिशादर्शक ठरली आहे.

- ऋषभ एकावडे