होर्मुझ सामुद्रधुनी बंद होणे म्हणजे केवळ एक समुद्री मार्ग बंद होणे नाही; तो जागतिक ऊर्जा व्यवस्थेला बसणारा गंभीर धक्का ठरू शकतो. तेलाचे दर, जागतिक व्यापार, आर्थिक स्थैर्य आणि भू-राजकीय समीकरणे या सर्वांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

होर्मुझ सामुद्रधुनी मार्गाने जाणारे तेल प्रामुख्याने आशियाई देशांकडे जाते. यामध्ये भारत, चीन, जपान व दक्षिण कोरिया हे प्रमुख देश आहेत. हे देश मध्यपूर्वेतील तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असल्यामुळे त्यांच्या ऊर्जा सुरक्षिततेवर मोठा परिणाम होऊ शकतो. होर्मुझ पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न झाला तर लगेचच महासत्तांची लष्करी हालचाल वाढेल. विशेषतः अमेरिका, रशिया व चीन यांची जहाजे आणि विमानवाहू नौका या परिसरात सक्रिय होतील. परिणामी समुद्री चकमकी होण्याचा धोका वाढेल. तेलवाहू जहाजांवर हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच अशी घटना मंगळवारी घडल्याचे वृत्त आहे. ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले होण्याची शक्यताही आहे. काही देशांनी होर्मुझ टाळण्यासाठी पर्यायी पाइपलाइन तयार केल्या आहेत. उदाहरणार्थ साऊदी अरेबिया ते रेड सी आणि पुढे ओमानपर्यंत असा मार्ग काही प्रमाणात सहाय्यभूत होऊ शकतो, मात्र तोही काही मर्यादेपर्यंत. या पाइपलाइनची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे पूर्णपणे होर्मुझचा पर्याय उपलब्ध नाही. होर्मुझ बंद झाल्यास तिसऱ्या महायुद्धाचा धोका का वाढू शकतो, यावर सध्या जगात चर्चा सुरू आहे. जागतिक भू-राजकारणात काही ठिकाणे अशी असतात की ती फक्त भौगोलिक नसून सामरिक ‘ट्रिगर पॉईंट’ ठरतात. हे त्याचे सर्वात ठळक उदाहरण आहे. जर ही सामुद्रधुनी बंद झाली, तर ती केवळ ऊर्जा संकट निर्माण करणार नाही, तर ती जागतिक महासत्तांना थेट संघर्षाच्या उंबरठ्यावर आणू शकते. आजच्या जगात तेल हे केवळ इंधन नाही, तर ते सत्ता आणि नियंत्रणाचे साधन आहे. जर होर्मुझ बंद करण्याचा प्रयत्न करत असेल, तर तो प्रत्यक्षात जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न ठरतो. यावर प्रतिक्रिया म्हणून आणि तिचे सहयोगी देश हस्तक्षेप करणे अपरिहार्य ठरते. इथेच संघर्षाची पहिली ठिणगी पडते. होर्मुझ परिसरात आधीच अमेरिकेची नौदल उपस्थिती आहे. जर तेल वाहतूक अडवली गेली, तर अमेरिका आणि तिचे सहयोगी देश थेट कारवाई करतील. इराण त्याला प्रत्युत्तर देईल. परिस्थिती प्रॉक्सी वॉरवरून प्रत्यक्ष युद्धाकडे वळेल.
मध्यपूर्वेत आधीच अनेक तणावबिंदू आहेत. इस्रायल व इराण युद्ध सुरूच आहे. दुसरीकडे येमेन युद्ध सुरू आहे. पाकिस्ताननेही मंगळवारी अफगाणिस्तानवर हल्ला केला. जागतिक व्यापाराचा मोठा हिस्सा समुद्रमार्गावर अवलंबून आहे. जर होर्मुझमध्ये संघर्ष झाला तर महत्त्वाचे समुद्री मार्ग युद्धक्षेत्र बनतील. इतर सामुद्रधुनीवरही (उदा. मलक्का) तणाव वाढेल. जागतिक व्यापार विस्कळीत होईल. यामुळे युद्ध केवळ एका प्रदेशापुरते मर्यादित राहणार नाही. ऊर्जा संकटातून आर्थिक युद्ध व त्यानंतर प्रत्यक्ष युद्धाकडे वाटचाल संभवते. जगातील काही देशांमध्ये संसाधनांसाठी स्पर्धा वाढेल. निर्बंध आणि आर्थिक युद्ध तीव्र होईल. सायबर हल्ले, पुरवठा साखळीवर हल्ले वाढतील. इतिहास सांगतो की, आर्थिक संघर्ष अनेकदा लष्करी संघर्षात परिवर्तित होतात. जर मोठ्या महासत्तांमध्ये थेट संघर्ष झाला, तर अण्वस्त्रधारी देश सहभागी होण्याची शक्यता वाढते. हे सर्व देश थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या गुंतले, तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. भारतासारख्या देशासाठी ही परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची ठरेल. देशासमोर ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न आणि परराष्ट्र धोरणात संतुलन राखण्याचे आव्हान निर्माण होईल.
भारतीय नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पाहता, भारताला एकाच वेळी तटस्थता आणि सक्रिय कूटनीती या दोन्हीचा समतोल साधावा लागेल. होर्मुझ सामुद्रधुनी बंद होणे म्हणजे केवळ तेलपुरवठा थांबणे नाही; ते जागतिक शक्तिसंतुलनाला धक्का देणारे पाऊल ठरू शकते. ऊर्जा, अर्थव्यवस्था, आणि सामरिक हितसंबंध या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की संघर्षाची तीव्रता निश्चितपणे वाढते. म्हणूनच, होर्मुझ हा केवळ समुद्री मार्ग नाही, तो जगाच्या शांततेचा ‘लिटमस टेस्ट’आहे. जर तो बंद झाला, तर तिसऱ्या महायुद्धाचा धोका केवळ काल्पनिक न राहता वास्तवात परिवर्तित होण्याची भीती निर्माण होऊ शकते.
होर्मुझ सामुद्रधुनी ही जगाच्या ऊर्जा पुरवठ्याची सर्वात महत्त्वाची समुद्री जीवनरेखा मानली जाते. जर कोणत्याही कारणामुळे हा मार्ग काही दिवसांसाठी किंवा काही आठवड्यांसाठीही बंद झाला, तर त्याचे परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित राहणार नाहीत; ते जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि विशेषतः ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या देशांवर गंभीर परिणाम करणारे ठरतील. होर्मुझ मार्गाने दररोज जवळपास २० दशलक्ष बॅरल तेल जगभर पाठवले जाते. जर हा मार्ग बंद झाला तर जागतिक बाजारात तेलपुरवठा अचानक कमी होईल. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर झपाट्याने वाढतील. पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किंमती वाढतील. त्यामुळे वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढेल. अर्थतज्ज्ञांच्या मते, अशी परिस्थिती निर्माण झाली तर कच्च्या तेलाची किंमत १५० ते २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाण्याची शक्यता असते. या कारणास्तव जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसेल. ऊर्जा म्हणजे आधुनिक अर्थव्यवस्थेचे रक्ताभिसरण. तेल पुरवठा अडखळला की औद्योगिक उत्पादन, वाहतूक, शेती आणि व्यापार यावर परिणाम होतो. यामुळे जागतिक महागाई वाढू शकते, आर्थिक मंदीचा धोका वाढू शकतो, शेअर बाजार अस्थिर होऊ शकतात, विशेषतः ऊर्जा आयातीवर अवलंबून असलेल्या आशियाई अर्थव्यवस्थांना मोठा फटका बसू शकतो.
भारत सुमारे ८५ % कच्चे तेल आयात करतो. त्यातील मोठा हिस्सा मध्यपूर्वेतून येतो. त्यामुळे पुरवठा अडला तर भारतात इंधन दर वाढू शकतात. त्यामुळे अन्नधान्य व वस्तू महाग होतील. तेल महाग झाले तर भारताला अधिक डॉलर खर्च करावे लागतील. त्यामुळे व्यापारी तूट वाढू शकते. रुपयावर दबाव येऊ शकतो. आखाती देशांत सुमारे ८० लाख भारतीय कामगार आहेत. जर त्या प्रदेशात युद्ध किंवा अस्थिरता वाढली तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. होर्मुझ सामुद्रधुनी बंद होणे म्हणजे केवळ एक समुद्री मार्ग बंद होणे नाही; ते जागतिक ऊर्जा व्यवस्थेला बसणारा गंभीर धक्का ठरू शकतो. तेलाचे दर, जागतिक व्यापार, आर्थिक स्थैर्य आणि भू-राजकीय समीकरणे या सर्वांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच जगातील महासत्तांसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवणे हा केवळ प्रादेशिक नव्हे तर जागतिक स्थैर्याचा मुद्दा बनला आहे.

गंगाराम केशव म्हांबरे
(लेखक पत्रकार असून विविध
विषयांवर लेखन करतात)
मो. ८३९०९१७०४४